नागपूर : काँग्रेसचे माजी मंत्री मुकुल वासनिक सकाळी नागपुरात आले. त्यांनी गांधीनगरातील आपल्या बंगल्यावर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक घेतली. चर्चेअंती हिंगणा, काटोल, उमरेडची उमेदवारी निश्चित करण्यात आली. कामठीचा पेच मध्यरात्रीनंतर सुटला. हिंगणा मतदारसंघासाठी जि.प. च्या माजी सदस्य कुंदा राऊत यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. राऊत या युवक काँग्रेसच्या रामटेक लोकसभा अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघात महिला बचत गटांच्या कौन्सिलिंगची जबाबदारी पार पाडली होती. काटोलचा उमेदवार ठरविण्यासाठी बरीच कसरत झाली. सुरुवातीला डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या पत्नी राजश्री जिचकार यांना विचारणा करण्यात आली. पण त्यांनी असमर्थता व्यक्त केली. यानंतर जि.प.चे माजी सदस्य चंद्रशेखर कोल्हे, प्रकाश वसू, दिनेश ठाकरे यांच्या नावावर चर्चा झाली. नंतर अमोल देशमुख यांना काटोलची उमेदवारी देण्याबाबत रणजित देशमुख यांना फोनवर विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनीही नकार कळविला. शेवटी चंद्रशेखर कोल्हे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटी पुन्हा एकदा यात फेरबदल करण्यात आला. जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश ठाकरे यांचे नाव निश्चित करण्यात आले. कामठीमध्ये राज्यमंत्री राजेंद्र मुळक व जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर इच्छुक होते. या दोन्ही नेत्यांनी वासनिक यांची भेट घेऊन दावा सादर केला. मध्यरात्रीनंतर मुळक यांच्या नावावर श्क्किामोर्तब झाले. उमरेडमध्ये जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय मेश्राम यांचे नाव निश्चित करण्यात आले. सावनेरमध्ये भाजपचे मुसळे सावनेरमध्ये गेल्यावेळी भाजपकडून लढलेले आशिष देशमुख यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या जागी जि.प.चे माजी सदस्य सोनबा मुसळे यांचे नाव निश्चित झाले आहे. जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर यांनीही तिकीट मागितले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी त्यांच्या पत्नी अरुणा मानकर यांची संधी हुकली. त्यामुळे त्यांचा दावा अधिक सक्षम मानला जात होता. मात्र, मानकर यांना शेजारच्या काटोल मतदारसंघात लढण्याचा आदेश देण्यात आला. असे करून मानकर गटालाही बांधून ठेवण्याचा पक्षाचा विचार आहे. मात्र रात्री पुन्हा यात फेरबदल झाले. उमेदवारी न मिळाल्याने आशिष देशमुख रुसले. त्यांना सावनेरमधील पदाधिकाऱ्यांसह वाड्यावर बोलाविण्यात आले. या वेळी झालेल्या चर्चेत त्यांना काटोलमधून लढण्यास सांगण्यात आले. मात्र, देशमुखांनी त्यासाठी होकार भरला नाही. त्यांचा कल रामटेकवर अधिक होता. पुढे देशमुखांचा विषय पेंडिंग राहिला. आता उद्या, शनिवारी सकाळी पुन्हा एकदा देशमुख व सावनेरातील पदाधिकाऱ्यांना वाड्यावर चर्चेसाठी बोलाविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
वासनिकांच्या बंगल्यावर तिकीट वाटप
By admin | Published: September 27, 2014 2:39 AM