पुणे मेट्रोकरिता अॅल्युमिनियम बॉडीचे कोच नागपुरात तयार होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:25 AM2019-08-18T00:25:37+5:302019-08-18T00:26:32+5:30
पुणे मेट्रोकरिता अॅल्युमिनियम बॉडीचे कोच नागपुरात तयार होणार असून, भारतीय स्वामित्वाची कंपनी टीटागढ फिरेमा मेट्रो कोचेस तयार करणार आहे. त्यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुणेमेट्रोकरिता अॅल्युमिनियम बॉडीचे कोच नागपुरात तयार होणार असून, भारतीय स्वामित्वाची कंपनी टीटागढ फिरेमा मेट्रो कोचेस तयार करणार आहे. त्यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मेट्रो रेल्वेची पूर्तता करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात भारतीय स्वामित्व असलेली कंपनी टीटागढ फिरेमाला कंत्राट मिळाले आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला एकूण १०२ कोचेसची आवश्यकता आहे. त्यापैकी २५ टक्के कोचेस इटली तर उर्वरित ७५ टक्के कोचेस नागपूर येथील महामेट्रोच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पात तयार होतील. अशा कोचेस भारतात पहिल्यांदाच तयार केल्या जातील. आतापर्यंत स्टेनलेस स्टील बॉडीचे कोचेस भारतातील विविध मेट्रो रेल्वे प्रकल्पात वापरले जातात. पण पहिल्यांदाच अॅल्युमिनियम बॉडीचे कोचेस पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पात वापरल्या जाणार आहे. हे कोचेस स्टेनलेस बॉडी कोचच्या तुलनेत हलके, अधिक ऊर्जा कार्यक्षम आणि सुंदर असतील. आधुनिक पद्धतीची कोच निर्मिती भारतातील मेट्रोकरिता बदल घडविणारी असेल. या बदलांसाठी केंद्राच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.
प्रारंभी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पात रेल्वे तीन कोचची राहणार आहे. आवश्यकतेनुसार सहा कोचपर्यंत वाढविण्यात येईल. कोच पूर्णपणे वातानुकूलित, डिजिटल डिस्प्ले, १०० टक्के सीसीटीव्हीने उपयुक्त आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आपात्कालीन बटन राहतील. आवश्यक भासल्यास प्रवासी ट्रेनमध्ये ऑपरेटरशी तसेच ओसीसीच्या आपत्कालीन नियंत्रणाशी बोलू शकतील. शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवासी प्रवास करू शकतील. मोबाईल व लॅपटॉप चार्जिंगची सुविधा राहणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोचेसच्या आतील व बाह्यभागात डिझाईन केले जाईल. कमाल वेग ९५ कि.मी. प्रति तास आणि एकाच वेळी ९२५ जण प्रवास करतील. मेट्रो कोचेस ऊर्जा कार्यक्षम तसेच ब्रेकिंग सिस्टमदरम्यान रिव्हर्स ऊर्जा तयार करू शकेल.