लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनात स्वप्न असेल, ते पूर्ण करण्याची जिद्द असेल आणि सोबत कुटुंबाचाही विश्वासपूर्ण पाठिंबा असेल तर मोठ्यातले मोठे स्वप्न आत्मविश्वासाने पूर्ण करता येते. नागपूरच्या अमृता देवेन पाघडाल यांनी ही बाब खरी करून दाखविली. देशभरातील विवाहित सौंदर्यवतींना मात देत उपराजधानीच्या अमृता यांनी डेलिवूडचा ‘मिसेस इंडिया-२०१८’ हा किताब प्राप्त केला आहे. त्यामुळे सौंदर्य क्षेत्रामध्येही संत्रानगरीची ओळख निर्माण केली आहे.अमृता या उद्योजक देवेन पाघडाल यांच्या पत्नी. विवाहानंतर महिलांचा सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग सहज स्वीकारला जात नाही. अमृता यांनी या अशक्य गोष्टीला शक्य केले. सौंदर्य स्पर्धांबाबत आवड असली तरी पूर्वी कधीही याबाबत विचार केला नव्हता. मिस, मिसेस व मिस्टर इंडिया आदी सौंदर्य स्पर्धा आयोजित करणाऱ्या दिल्लीच्या डेलिवूडतर्फे ही सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी एप्रिल महिन्यात नागपूरला आॅडिशन घेण्यात आले. त्याही या आॅडिशनमध्ये सहभागी झाल्या. मात्र परीक्षकांना त्यांच्यातील आत्मविश्वास आवडला व त्यांची निवड केली. हा त्यांच्यासाठीही आश्चर्याचा धक्का होता. मात्र निवड झाल्याने त्यांनी गंभीरतेने हे आव्हान स्वीकारले. दोन महिने त्यांच्याकडे होते. सौंदर्य स्पर्धा म्हटले की आहारात बरेच परिवर्तन करावे लागते. मात्र बाहेरच्या खाद्यपदार्थावर बंधन घालण्यापलीकडे फार परिवर्तन न केल्याचे त्यांनी सांगितले. त्यापेक्षा सौंदर्य स्पर्धामध्ये चालणे, व्यवहार, हावभाव, वक्तृ त्व आणि व्यक्तिमत्त्वाबाबत अधिक अभ्यास केल्याचे त्या म्हणाल्या. १५ जुलैपासून दिल्ली येथे प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाली. देशभरातील ४१ महिला स्पर्धक यामध्ये सहभागी होते. यावेळी डेलिवूडचे संस्थापक विनोद अहलावत, त्यांच्या पत्नी ओनम अहलावत आणि नृत्य दिग्दर्शक बाबला कथुरीया यांनी विशेष मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यातील आत्मविश्वासाने स्पर्धेचे विजेते पद पटकाविण्यासह बुद्धिमत्ता व सर्वोत्कृष्ट हास्याचा किताबही त्यांनी प्राप्त केला.सौंदर्य स्पर्धांचा विषय आजही समाजामध्ये सन्मानाने स्वीकारला जात नाही. मात्र पाघडाल कुटुंबाने अतिशय विश्वासाने अमृता यांना पाठिंबा दिला. कुटुंबाच्या सहकार्याने आपण विजेता ठरू शकल्याचे अमृता यांनीही मान्य केले. स्वत:ला सिद्ध करायचे व या क्षेत्रात चांगली माणसे आहेत हे समाजाला सांगायचे होते. या क्षेत्रात पुढच्या वाटचालीबाबत विचार केला नाही, मात्र आपल्या शहरात संधी मिळाली तर नक्की विचार करेन, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.