लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘नॅक’चे मूल्यांकन करण्यासाठी चालढकल करणाऱ्या महाविद्यालयांना असे करणे महागात पडणार आहे. जर येणाऱ्या काळात त्यांनी मूल्यांकन केले नाही तर त्यांना मिळणारे अनुदान बंद होऊ शकते. हेच नाही तर तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीदेखील बंद होऊ शकते. कारवाईपासून वाचण्यासाठी महाविद्यालयांना ‘नॅक’कडे मूल्यांकनासाठी अर्ज करावाच लागणार आहे.‘नॅक’ने मूल्यांकनाच्या नियमावलीत बदल केला आहे. ही नियमावली लागू करत असतानाच महाविद्यालयांना मूल्यांकन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मूल्यांकनाच्या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी मंगळवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी सेंटरमध्ये ‘रुसा’तर्फे (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन ‘रुसा’च्या प्रधान सचिव व राज्य प्रकल्प अधिकारी मीता राजीवलोचन यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, विद्यापीठातील ‘रुसा’चे समन्वयक डॉ.मनोज राय, विद्यापीठाच्या ‘आयक्यूएसी’चे संचालक डॉ.सुरेश झाडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे २१८ प्रतिनिधींसमवेत गोंडवाना विद्यापीठातील ३२ महाविद्यालयांचे प्रतिनिधीदेखील सहभागी झाले होते.‘नॅक’चे मूल्यांकन केल्यास महाविद्यालयांना फायदाच होणार आहे. हे सर्वांसाठीच अनिवार्य आहे. राज्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता व पातळी वाढविण्यासाठी महाविद्यालयांना ‘नॅक’चे मूल्यांकन करावेच लागेल, असे मीता राजीवलोचन यांनी सांगितले.कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या सत्रात ‘रुसा’चे प्रशिक्षक डॉ.एम.आर.कुरुप व दुसऱ्या सत्रात जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.प्रीती बजाज यांनी महाविद्यालय प्रतिनिधींना प्रशिक्षण दिले. सोबतच त्यांच्या प्रश्नांचीदेखील उत्तरे दिली. महाविद्यालयांनी नेमके अर्ज कसे भरावे व इतर तयारी कशी करावी, यावर त्यांनी प्रकाश टाकला.