... आणि मध्यरात्री जाऊन त्यांनी वाचवला आजीबाईचा जीव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 11:59 AM2020-09-16T11:59:31+5:302020-09-16T12:00:04+5:30
पत्र्याच्या एका लहानशा खोपटात एकट्या राहणाऱ्या आजीबाई. कसा कोण जाणे पण त्यांच्या त्या लहानशा झोपडीत तब्बल साडेचार फुटाचा जाडजूड मण्यार साप घुसला व पलंगाखाली दडून बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शहरातील शांतीनगर हा भाग. कावळापेठ रेल्वे क्रॉसिंगलगतची वस्ती.. बुधवारी मध्यरात्रीची वेळ. पत्र्याच्या एका लहानशा खोपटात एकट्या राहणाऱ्या आजीबाई. कसा कोण जाणे पण त्यांच्या त्या लहानशा झोपडीत तब्बल साडेचार फुटाचा जाडजूड मण्यार साप घुसला व पलंगाखाली दडून बसला. आजीबाईंचे नशीब मोठे की तो बाहेर खेळणाऱ्या मुलांनी पाहिला व त्यांनी आरडाओरडा करत सगळ्याना सूचित केले..
पाहता पाहता नागरिकांची गर्दी जमली. पण कोणाचीही हिंमत होईना त्या सापाला पकडण्याची. अखेरीस पोलिसांना फोन केला गेला. पोलिसांनी सर्पमित्र शुभम पराळे यांना कळवले. तेव्हा मध्यरात्र होत आली होती.. वस्तीतील सर्वजण जागेच होते. शुभम पराळे यांनी फक्त त्याकडे नीट लक्ष ठेवा, त्याला काहीच करू नका अशा सूचना दिल्या व ते तातडीने निघाले.
आजीबाईंना कमीतकमी हालचाल करीत पलंगावरून खाली येऊन बाहेर येण्याची सूचना केली व त्यांनी तशी ती पाळलीही. काही वेळातच सर्पमित्र हजर झाले. त्यांनी त्या विषारी जातीच्या सापाला पकडून बरणीत बंद केले व वनविभागाच्या सुपूर्द केले.. आणि आजीबाईंसह सगळ्यानी सुटकेचा निश्वास टाकला.. हे सगळे घडले तेव्हा मध्यरात्र उटलून गेली होती.. सर्वांनी सर्पमित्राचे आभार मानले व बक्षीसही दिले...