चिमुकल्यांच्या जीवितास धोका : ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप सावनेर/नांदागोमुख : पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्यावतीने नांदागोमुख येथे अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. विशेष म्हणजे, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने अंगणवाडीच्या इमारतीसाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून देऊनही बांधकाम विभागाने सदर इमारत जोग नदीच्या पात्रात बांधली. पुराचे पाणी या इमारतीमध्ये शिरत असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बांधकामात ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेतले नाही, अशी माहिती सरपंच धीरणकन्या घोरले यांनी दिली. नांदागोमुख येथे अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम करण्याचा निर्णय २०१३ मध्ये घेण्यात आला. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाने ३० मार्च २०१३ रोजी पार पडलेल्या मासिक सभेत सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. या इमारतीसाठी वॉर्ड क्रमांक -१ मधील समाज मंदिराच्या बाजूला असलेल्या सोमकुवर यांच्या घराच्या शेजारी असलेल्या जागेची निवड करण्यात आली. तशी नोंद या ठरावात करण्यात आली. पंचायत समितीचे सहायक शाखा अभियंता कोंबाडे यांनी या जागेची पाहणीही केली. याच काळात नांदागोमुख येथील जोग नदीच्या पात्रात ले - आऊट पाडण्यात आले. यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर करण्यात आला. या ले-आऊटच्या निर्मितीमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेण्यात आले नव्हते, असा आरोप सरपंच धीरणकन्या घोरले यांनी केला. पुढे या ले-आऊ टमधील भूखंडाची निवड अंगणवाडी इमारतीच्या बांधकासाठी करण्यात आली. नदीच्या पात्रात बांधकामाला सुरुवात होताच ग्रामपंचायतच्या सात सदस्यांनी २६ डिसेंबर २०१४ रोजी तत्कालीन खंडविकास अधिकारी कोल्हे यांना निवेदन देऊन ही बाब गंभीर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनीही पंचायत समिती प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून या बांधकामावर आक्षेप नोंदविला होता. प्रशासन या तक्रारींची दखल घेत नसल्याचे लक्षात येताच ३१ डिसेंबर २०१४ रोजीच्या विशेष ग्रामसभेत आणि १२ फेब्रुवारी २०१५ च्या ग्रामपंचायत मासिक सभेत या बांधकामावर चर्चा करण्यात आली. सदर बांधकाम जीवित हानीस कारणीभूत ठरणारे असल्याचा ठराव पारित करून कार्यवाहीस्तव पंचायत समितीकडे पाठविण्यात आला. त्यानंतर दीड वर्ष सदर बांधकाम थांबविण्यात आले. या अवैध बांधकामाला पंचायत समितीतील काही अधिकारी जबाबदार असल्याचा तसेच शासकीय निधीचा दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निरपेक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांकडून बांधकामावर करण्यात आलेला संपूर्ण खर्च वसूल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी) नियमबाह्य बांधकाम कोणत्याही नदीच्या पात्रात किंवा पात्रापासून १०० फुटाच्या परिसरात कोणतेही बांधकाम नियमबाह्य ठरते. अशा प्रकारच्या बांधकाम अथवा बांधकामासाठी करण्यात येणाऱ्या खोदकामास नियमाप्रमाणे प्रतिबंध घातला जातो. नांदागोमुख येथे चक्क नदीच्या पात्रात ले - आऊट तयार करून त्याला प्रशासनाने मंजुरी दिली. त्यावर कळस म्हणून पात्रात अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या भावनांना डावलून अधिकारी आपण खरे असल्याची बतावणी करीत आहेत. बालविकास प्रकल्प अधिकारी कुमरे यांनी १२ मार्च २०१५ रोजी या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी सरपंच घोरले अनुपस्थित होत्या. चौकशीच्यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांसह काही सदस्यांचे बयाण नोंदविण्यात आले. या इमारतीचे बांधकाम योग्य ठिकाणी असल्याचे तसेच इमारतीचा परिसर लहान मुलांच्या दृष्टीने अनुकूल असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.
नदीपात्रात बांधली अंगणवाडी
By admin | Published: July 31, 2016 2:47 AM