विकास झाडे व गजानन निमदेव यांना अनिलकुमार स्मृती पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 09:43 AM2020-09-14T09:43:42+5:302020-09-14T09:44:05+5:30
लोकमतच्या दिल्ली एडिशनचे निवासी संपादक विकास झाडे आणि ज्येष्ठ पत्रकार तथा तरूण भारतचे संपादक गजानन निमदेव यांना २०१९ चा विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्रकारितेत मतभिन्नता असू शकते पण विचारांशी कटीबद्ध राहून समाजहिताला प्राधान्य देत काम करणे महत्त्वाचे आहे. अशा विचारनिष्ठ माणसांना प्रसंगी किंमतही मोजावी लागते. मात्र समाजाच्या न्यायासाठी निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या सर्वांचा हा गौरव आहे, अशी भावना केंद्रीय रस्ते परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा २०१९ च्या स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. लोकमतच्या दिल्ली एडिशनचे निवासी संपादक विकास झाडे आणि ज्येष्ठ पत्रकार तथा तरूण भारतचे संपादक गजानन निमदेव यांना २०१९ चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिव्हील लाईन्सच्या प्रेस क्लबच्या सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात राज्याचे उजार्मंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राउत यांच्यासह विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट तथा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, संघाचे व प्रेस क्लबचे सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर आदी उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी व्हर्चुअल माध्यमाद्वारे सोहळ्यात हजेरी लावली. त्यांनी विकास झाडे व निमदेव यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची प्रसंशा केली. निमदेव यांनी विचारांशी एकनिष्ठ राहून समाजाचे हित जोपासले तर विकास झाडे यांनी दिल्लीत राहून विदभार्चा आवाज बुलंद ठेवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. असे निरपेक्षा भावनेने कार्य करणाऱ्या पत्रकारांसाठी ते प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री नितीन राउत यांनीही झाडे व निमदेव यांच्या योगदानाचे कौतुक केले. एखाद्या पत्रकाराची लेखणी कशाप्रकारे चालली, त्या कालावधीत त्यांच्या लेखणीने समाजाला काय दिले, हे महत्त्वाचे आहे. समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या ज्येष्ठ व श्रेष्ठ पत्रकारांना सलाम आहे. वर्तमानात सरकारविरुद्ध लेखन करणाऱ्यांना राष्टद्रोही ठरविले जाते. तरीही काही लोक न भीता कार्य करतात. कोरोनाच्या संकट काळात पत्रकार योद्धाप्रमाणे काम करीत आहेत. अशा विरोधाभासी परिस्थितीत विचारांशी बांधील राहून काम करणाऱ्या पत्रकारांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
गजानन निमदेव यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या व जीव गमावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी कोविड निधी म्हणून पुरस्काराची राशी पत्रकार संघाला दान केली. विकास झाडे यांनीही व्यसनाधीन लोकांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या सत्यनारायण नुवाल संस्थेला पुरस्कार राशी दान करण्याचे जाहीर केले. संचालन ब्रम्हाशंकर त्रिपाठी यांनी तर नगरसेविका प्रगती पाटील यांनी आभार मानले.
हे संकट जाईल पण काळजी घ्या
नितीन गडकरी यांनी लोहिया विचार प्रचारक हरिश अड्याळकर यांच्या निधनाबद्दल दु:ख आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अटलबहादूर सिंह यांची प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. भेटायला जाता येत नाही म्हणून खंतही व्यक्त केली. नि:स्वार्थ भावनेने काम करणारे आपले सहकारी सोडून जात आहेत, यामुळे निराशा आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कोरोनाचा काळ कठीण वाटायला लागला आहे. तो लवकर जाईल पण आपण सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
उड्डानपुलाच्या भिंतीवर दिसेल लोकनेत्यांचा इतिहास
१९४७ पासून सामाजिक, राजकीय, क्रीडा, कला, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नागपुरातील ५० लोकनेत्यांचा गौरव करण्यासाठी सदर उड्डानपुलाच्या भिंतीवर चित्रकारितेतून इतिहास मांडण्याची योजना नितीन गडकरी यांनी मांडली. हे काम चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.