मनपा सभागृहात‘जय श्रीराम’च्या घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:06 AM2019-06-29T00:06:46+5:302019-06-29T00:12:10+5:30
महापालिका सभागृहात प्रामुख्याने पाणी,रस्ते, गडर लाईन, पथदिवे, कचरा आदी विषयावर चर्चा होत असते. परंतु शुक्रवारी राष्ट्रीय स्तरावरील मुद्दे उपस्थित झाले. यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या काही ज्येष्ठ नगरसेवकांत चांगलीच जुंपली. यात काही वेळ स्थानिक मुद्दे बाजुला पडले. चर्चेदरम्यान मॉब लिंचिंग, जय श्रीरामच्या घोषणा, शीख दंगल, महात्मा गांधी यांना डावलणे, गोडसेची विचारसरणी लादण्याचा आरोप-प्रत्यारोपाचा प्रकार बघायला मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका सभागृहात प्रामुख्याने पाणी,रस्ते, गडर लाईन, पथदिवे, कचरा आदी विषयावर चर्चा होत असते. परंतु शुक्रवारी राष्ट्रीय स्तरावरील मुद्दे उपस्थित झाले. यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या काही ज्येष्ठ नगरसेवकांत चांगलीच जुंपली. यात काही वेळ स्थानिक मुद्दे बाजुला पडले. चर्चेदरम्यान मॉब लिंचिंग, जय श्रीरामच्या घोषणा, शीख दंगल, महात्मा गांधी यांना डावलणे, गोडसेची विचारसरणी लादण्याचा आरोप-प्रत्यारोपाचा प्रकार बघायला मिळाला.
सत्तापक्षाने विरोधकांच्या आरोपांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु याला राजकीय स्वरुप आल्याने चर्चा भरकटली. लगेच ही बाब सदस्यांच्या लक्षात आली. महापालिका सभागृह राष्ट्रीय मुद्यावर नाही तर येथे स्थानिक प्रश्नावर चर्चा व्हावी, त्यामुळे सभागृहात व सभागृहाबाहेर सत्तापक्ष व विरोधक आपसात गप्पात गुंग झाले.
महापालिका सभागृहात सकाळी ११ ला अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली. सत्तापक्षाने प्रदीप पोहाणे यांच्या अर्थसंकल्पाचे जोरदार समर्थन केले तर विरोधकांनी हा आकड्यांचा खेळ असल्याचा आरोप केला. यात नवीन काहीही नसल्याचे सांगितले. काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचे भाषण सुरू होताच चर्चा राष्ट्रीय मुद्याकडे वळली. गुडधे यांनी अर्थसंकल्पातील उल्लेखाचे उदाहरण देत जालियांवाला बाग कांड हे मॉब लिंचिंगच्या घटनेचाच प्रकार आहे. जय श्रीरामचा नारा न देणाऱ्यांचे जमाव बळी घेत आहेत. यातून सरकारचे अपयश स्पष्ट होते. भगवान रामाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असे गुडधे म्हणाले.
यावर भाजपाचे नगरसेवक जय श्रीरामच्या घोषणा देऊ लागले. यावर गुडधे यांनी आक्षेप घेत देवाच्या नावावर मॉब लिंचिंग करणाऱ्यांना माफ करू नये. देवाचे नाव बदनाम करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. यात सत्तापक्षनेते संदीप जोशी हस्तक्षेत करीत म्हणाले,जालियांवाला बाग, मॉब लिंचिंग, जय श्रीराम नारे याचा अर्थसंकल्पाशी काय संबंध? पण जर कुणाला मॉब लिंचिंगवर चर्चा करावयाचीच असेल तर आम्ही त्यावर स्वतंत्र चर्चा करण्यास तयार आहोत. १९८४ ची शीख दंगल कुणी घडवून आणली.
गोडसेंचे विचार असल्याने गांधीजींना विसरलात
महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आहे. परंतु अर्थसंकल्पात याचा साधा उल्लेखही नाही. कारण भाजपा गोडसेच्या विचारसरणीचे समर्थन करते. म्हणूनच गोडसेचे समर्थन करणारी प्रज्ञासिंह ठाकूर हिला भाजपाने खासदार केल्याचा आरोप प्रफुल्ल गुडधे यांनी केला. हनुमाननगर झोनला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यापूर्वी झोन कार्यालय सक्षम करा. असे झाले तर लोकांना झोन कार्यालयाची बदनामी करण्याची संधी मिळणार नाही. झोन कार्यालयाची बदनामी झाली तर महाराजांची होईल.
मुस्लीम संकटात असल्याचे सांगून काँग्रेस मते मागते
गुडधे यांच्या आरोपावर भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी म्हणाले, काँग्रेसची विचारसरणी विरोधकांना दडपणारी आहे. सर्वांना सोबत घेऊ न चालणाराच पुढे जातो. आज काँग्रेसची अवस्था सर्वांपुढे आहे. काँग्रेसचा इतिहास आहे, जेव्हा त्यांना हरण्याची भीती वाटते अशा वेळी त्यांच्या समर्थकांनी दंगली घडविल्या. मुस्लीम संकटात असल्याचे सांगून त्यांची मते घेतली. चौकशीनंतर आरोपींची नावे स्पष्ट झालेली आहेत. मनपा सभागृहात चर्चा करावी. राजकारण करण्याची गरज नव्हती, असेही तिवारी म्हणाले.