काँग्रेसला आणखी एक धक्का; आदिवासी नेते नामदेव उसेंडी यांचा भाजपमध्ये प्रवेश
By योगेश पांडे | Published: March 26, 2024 09:14 PM2024-03-26T21:14:57+5:302024-03-26T21:15:14+5:30
मंगळवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मानव विकास निर्देशांकात मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणे हे आपले ध्येय आहे.
नागपूर : उमरेडचे आमदार राजू पारवे यांच्यानंतर कॉंग्रेसला विदर्भात आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मंगळवारी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत आदिवासी काँग्रेसच्या २२ जिल्ह्यांतील अध्यक्षांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचा त्यांनी दावा केला.
मंगळवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मानव विकास निर्देशांकात मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करणे हे आपले ध्येय आहे. कॉंग्रेसच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. गडचिरोलीतील स्थानिक उमेदवार म्हणून कॉंग्रेसकडे तिकीट मागितले होते. मात्र स्थानिक व राज्य पातळीवरील कॉंग्रेस नेतृत्वाने षडयंत्र करून बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली. कॉंग्रेसमध्ये आदिवासी समाजाचे ऐकले जात नाही. त्यामुळे मी पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे. भाजप सत्तेत असून जिल्हाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे डॉ.उसेंडी यांनी सांगितले. कुठलीही उमेदवारी किंवा पदाची आकांक्षा घेऊन भाजपमध्ये आलेलो नाही असा दावादेखील डॉ.उसेंडी यांनी केला.
काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये येत आहेत आणि येत राहतील. उसेंडी यांना भाजपमध्ये पूर्ण सन्मान मिळेल काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच ओबीसी व आदिवासी समाजाचा अपमान करतात. ते कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.आम्ही संन्यासी नाही, सर्वांचेच स्वागत करू
अन्य पक्षांच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबत बावनकुळे यांना विचारणा केली असता आम्ही संन्यासी नाही असे त्यांनी वक्तव्य केले. उसेंडी हे एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत. पक्षात कोणी आले तर त्यांचे आम्ही स्वागतच करू. आम्ही संन्यासी नाही, देशाच्या विकासासाठी राजकारण करत आहोत असे ते म्हणाले. भाजपचे कार्यकर्ते बाहेरच्या नेत्यांच्या येण्याने नाराज असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, भाजपमध्ये कोणताही कार्यकर्ता नाराज नाही. पक्षात सर्वांना सन्मान व सोबत घेऊन चालण्याची भावना आहे असे ते म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे कॉंग्रेस नेते पक्ष सोडत आहेत. पटोले यांनी अशोक चव्हाण, राजू पारवे, डॉ. उसेंडी यांचा आदर केला असता तर त्यांनी काँग्रेस सोडली नसती, असा चिमटा त्यांनी काढला.