नागपुरातील गॅंगस्टर आंबेकरविरुद्ध आणखी एक गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:03 PM2019-10-22T23:03:03+5:302019-10-22T23:08:47+5:30

कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर याने एका हत्याकांडात सहआरोपी असलेल्या त्याच्या टोळीतील एका गुन्हेगारालाही धमकी देऊन त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले आहे.

Another crime against gangster Ambekar in Nagpur | नागपुरातील गॅंगस्टर आंबेकरविरुद्ध आणखी एक गुन्हा

नागपुरातील गॅंगस्टर आंबेकरविरुद्ध आणखी एक गुन्हा

Next
ठळक मुद्देटोळीतील साथीदारालाही फसवले : ११ लाखांची खंडणी उकळलीमंत्रालयात आणि न्यायालयात एक कोटी खर्च घातल्याची मखलाशी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर याने व्यापारी उद्योजक, नोकरदार यांची फसवणूक करून त्यांच्याकडून तर खंडणी वसूल केलीच. मात्र,एका हत्याकांडात सहआरोपी असलेल्या त्याच्या टोळीतील एका गुन्हेगारालाही त्याने धमकी देऊन त्याच्याकडूनही आंबेकरने लाखो रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले आहे. तहसील पोलीस ठाण्यात जयभारत काळे (वय ४३) नामक व्यक्तीने तशी तक्रार नोंदवताच पोलिसांनी आरोपी संतोष आंबेकर (वय ४९), राजेंद्र ऊर्फ राजा गुलाबराव अरमरकर (वय ५३) आणि नीलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३४) या तिघांविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल आहे.
विशेष म्हणजे, आंबेकरने काळे याच्याकडून रक्कम उकळताना त्याला ही रक्कम मंत्रालय तसेच न्यायालयात वापरण्यात आली, त्याचमुळे एका हत्याकांडात निर्दोष सुटका झाल्याचे म्हटल्याचे पोलीस रेकॉर्डवर आले आहे. या घडामोडीमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.
कधी काळी चांगला मित्र असलेला मात्र एका व्यवहारामुळे विरोधात गेलेला कुख्यात गुंड बाल्या गावंडे याची कुख्यात संतोष आंबेकरने सावजीच्या माध्यमातून हत्या करवून घेतली होती. या हत्याकांडाचा मास्टर मार्इंड संतोष आंबेकरच होता, मात्र तो फरार झाला. या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत आंबेकर फरारच होता. पुरावे नसल्यामुळे या हत्याकांडातील आरोपींना दोषमुक्त करण्यात आले. त्यानंतर संतोषने डिसेंबर २०१८ मध्ये पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. या हत्याकांडात जयभारत काळे हा देखील आरोपी होता. बाल्याच्या खुनातून जामिनावर बाहेर येण्यासाठी, आपल्या बाजूने निर्णय देण्यासाठी न्यायाधीशाला, मोक्काची कारवाई न करण्यासाठी मुंबई मंत्रालयात एक कोटी रुपये खर्च केले, असे संतोषने जयभारत काळे याला सांगितले होते. त्यातील १५ लाखांची रोकड काळेला परत मागितली होती. पैसे नसल्याने काळेला आंबेकरचा राईट हॅण्ड सराफा राजू अरमरकर याच्याकडून व्याजाने १५ लाख रुपये घेतल्याचे संतोषने सांगितले. या रकमेच्या व्याजापोटी आरोपी राजू अरमरकर आणि संतोषचा भाचा नीलेश केदार हे दर महिन्याला ३ टक्के व्याजदराने काळेकडून ४५ हजार रुपये उकळत होते. व्याजाची रक्कम देण्यास एक दिवस उशीर झाला तर त्यासाठी प्रति दिवस एक हजार रुपये जास्त घेतले जायचे.
शिवीगाळ करून धमकीही द्यायचे. अशाप्रकारे सराफा अरमरकर आणि नीलेश केदार यांनी काळेकडून आतापर्यंत ११ लाख २५ हजार रुपये उकळले होते. दर महिन्याला ४५ हजार रुपये देणे शक्य नसल्यामुळे आणि पोलिसांनी आंबेकरविरुद्ध कडक कारवाई सुरू केल्याने काळेला हिंमत आली. त्यामुळे त्याने मंगळवारी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी कलम ३८६, ५०४, ५०६ (ब), ३४ आणि सावकारी कायद्याचे सहकलम ४४,४५ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचाही तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

Web Title: Another crime against gangster Ambekar in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.