आपली बस महामेट्रोच्या स्वाधीन : परिवहन समितीत प्रस्ताव येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 11:00 PM2021-02-22T23:00:36+5:302021-02-22T23:02:28+5:30
Apali bus will be handed over to Mahametro बिकट आर्थिक स्थितीमुळे नागपूर महापालिकेने आपली बससेवा महामेट्रोच्या स्वाधीन करण्याची योजना तयार केली आहे. यातूनच गुरुवारी होणाऱ्या परिवहन समितीच्या बैठकीत बससेवा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिकट आर्थिक स्थितीमुळे नागपूर महापालिकेने आपली बससेवा महामेट्रोच्या स्वाधीन करण्याची योजना तयार केली आहे. यातूनच गुरुवारी होणाऱ्या परिवहन समितीच्या बैठकीत बससेवा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परिवहन सेवा एकाच प्राधिकरणाकडे असावी, अशी भूमिका वेळोवेळी मांडली आहे. त्यानुसार परिवहन सेवा महामेट्रोच्या माध्यमातून चालविण्याचा प्रस्ताव आणल्याचा उल्लेख प्रस्तावात आहे. वास्तविक अद्याप महामेट्रोकडून मनपाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मनपाने स्वत: हा प्रस्ताव तयार केला आहे. २५ फेब्रुवारीच्या परिवहन समितीच्या बैठकीत तो ठेवला जाणार आहे.
नियम व अटीच्या अधीन राहून बससेवा महामेट्रोला देण्याचा प्रस्ताव आहे. मनपा बससेवेवर वर्षाला १६४.८३ कोटीचा खर्च करते, तर उत्पन्न ६४.४६ कोटी असल्याची माहिती प्रस्ताव आहे. म्हणजेच १०० कोटीचा तोटा आहे. त्यात केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या ४० इलेक्ट्रिक बसमुळे मनपावर पुन्हा २० कोटीचा बोजा वाढणार आहे. ३६० रेड बसचे संचालन कोविड संक्रमणापूर्वी मनपा करीत होती. तीन रेड बस ऑपरेटर व एक इलेक्ट्रिक बस ऑपरेटरच्या माध्यमातून बसचे संचालन होत आहे. महामेट्रोने मनपाला बुटीबोरी ते सीताबर्डी व हिंगणा ते सीताबर्डी दरम्यानची बससेवा बंद करण्याचा सल्ला दिला होता. वास्तविक मनपा फिडर बससेवा उपलब्ध करण्याला तयार आहे. या मार्गावरील बससेवा बंद केल्यास आपली बसला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. परिवहन समितीच्या मंजुरीनंतर प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवला जाईल. त्यानंतर राज्य सरकार व केंद्र सरकारची मंजुरी मिळाली तरच बससेवा हस्तांतरित करणे शक्य होईल.
सत्तापक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महामेट्रो स्वत:ला सक्षम करण्यात अपयशी ठरली आहे. मेट्रो सेवेचे खासगीकरण केले जात आहे. अशा परिस्थितीत आपली बस महामेट्रोला हस्तांतरित केल्यास नागरिकांना मिळत असलेली बससेवाही मिळणार नाही. विशेष म्हणजे वर्ष २०१७ मध्ये बस ऑपरेटरची नियुक्ती करताना १० वर्षांसाठी बससेवा संचालित करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. आयबीटीएम ऑपरेटर डिम्टसची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली. अशा परिस्थितीत सेवा हस्तांतरित करावयाची झाल्यास यासाठी अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
फिडर बससेवेसाठी १८ बस
मनपाच्या परिवहन विभागातर्फे महामेट्रोला फिडर बससेवेसाठी १८ बस उपलब्ध करण्याचा प्रस्ताव या बैठकीत ठेवला जाणार आहे. ३५०० रुपये प्रति बस याप्रमाणे मोबदला देण्याला महामेट्राची तयारी आहे. दुसरीकडे मनपा बस ऑपरेटरला प्रति दिन ९ हजार रुपये देत आहे. वास्तविक यापूर्वी ४५०० रुपये प्रति दिनच्या आधारावर एक इलेक्ट्रिक बस महामेट्रोला देण्यात आली आहे. परंतु यासाठी परिवहन समितीची मंजुरी घेण्यात आलेली नाही. याबाबतचा प्रस्ताव नोंदीसाठी समितीकडे येणार आहे.