अप्पूने गायब केले दस्तऐवज
By Admin | Published: May 9, 2017 01:37 AM2017-05-09T01:37:23+5:302017-05-09T01:37:23+5:30
भूमाफिया ग्वालबन्सी टोळीचा ‘पॉवर हाऊस’ बिल्डर अप्पूने त्याच्या गळ्यातील फास होऊ शकणारे दस्तऐवज गायब केले आहेत.
वेळीच कारवाई का नाही ? : पीडितांनी सांगितल्यावरही पोलिसांना जाग नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूमाफिया ग्वालबन्सी टोळीचा ‘पॉवर हाऊस’ बिल्डर अप्पूने त्याच्या गळ्यातील फास होऊ शकणारे दस्तऐवज गायब केले आहेत. ग्वालबन्सी प्रकरण समोर आले तेव्हापासूनच अप्पू या कामी लागला होता. पोलिसांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्याने अप्पू सहजपणे हे काम करू शकला. यामुळे शहरातून भूमाफियांना मुळासकट उखडून फेकण्याच्या पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या मोहिमेलाच धक्का बसू शकतो.
१९ एप्रिल रोजी दिलीप ग्वालबन्सी आणि माजी नगरसेवक राजेश माटे यांच्याविरुद्ध मनपा ठेकेदार भूपेश सोनटक्के यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच ग्वालबन्सी टोळीची उलटगणती सुरू झाली. पोलिसांनी दिलीप ग्वालबन्सी, त्याचा भाऊ भाजपा नगरसेवक जगदीश ग्वालबन्सी, पुतण्या काँग्रेस नगरसेवक हरीश, शैलेश आणि भाचा पप्पू यादव आणि साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ११ प्रकरणांत दिलीप, दोन प्रकरणात जगदीश, पप्पू, शैलेश आणि एका प्रकरणात हरीश आरोपी असल्याचे सांगितले जाते.
एप्रिल महिन्यात दिलीपला अटक होताच अप्पू सतर्क झाला. अप्पूला जमिनीची ओळख आहे. त्याच्या इशाऱ्यावरून ग्वालबन्सी टोळीने अनेक जमिनींवर कब्जा केला.
जमिनीचे मालक अप्पूसोबत सौदा करण्यासाठी तयार झाल्यावरच कब्जा सोडला जातो. याप्रकारे अप्पूने अनेक वादातीत जमिनी खरेदी केल्या आहेत. त्या जमिनीचे दस्तऐवज अप्पूच्या कार्यालयातच होते. दिलीप ग्वालबन्सीला अटक झाल्यावर सर्वात अगोदर त्याच्यावरच संशय येईल म्हणून अप्पूने महत्त्वपूर्ण दस्तऐवज गायब केले.
फसवणुकीच्या प्रकरणात दस्तऐवज हेच सर्वात महत्त्वाचे ठरतात. ग्वालबन्सी टोळीकडून दस्तऐवज मिळविण्यास पोलिसांनी महत्त्व दिले नाही. पोलिसांनी ४ मे रोजी हजारीपहाड येथील सिद्धू चव्हाण ऊर्फ सांड्यासह दोघांच्या ठिकाणांवर धाड टाकली. तेव्हा पोलिसांना केवळ सांड्याच्या घरातून १४ रजिस्ट्री, २ पॉवर आॅफ अटर्नी, ५ करारनामे आणि १७ इतर दस्तऐवज सापडले. इतर ठिकाणी पोलिसांना काहीच गवसले नाही. सांड्या हा ग्वालबन्सीचे जनावरे सांभाळतो. पोलिसांना अप्पूजवळ दस्तऐवजाचे गठ्ठे असल्याची माहिती होती. त्याला सोडून दुसऱ्यांच्या घराची झडती घेण्यात आली. पीडितांनीसुद्धा पोलिसांना अप्पूचे घर आणि कार्यालयात दस्तऐवज शोधण्यास सांगितले होते. पोलिसांनी याकडेही दुर्लक्ष केले. त्यामुळे अप्पू बिनधास्तपणे नेता आणि इतर दुसऱ्या संपर्काच्या माध्यमातून स्वत:ला ‘सेफ’ करण्याच्या कामाला लागला.
भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक जगदीश ग्वालबन्सीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. नेता आणि ग्वालबन्सी समर्थक हे प्रकरण निस्तारण्यासाठी पूर्ण ताकदीने लागले आहेत. त्यामुळे आता नवीन गुन्हा दाखल होताना दिसून येत नाही. पोलीस ग्वालबन्सीचा भाचा प्रेम यादव आणि जॉन अॅन्थोनी, ईश्वर सुप्रेटकर ऊर्फ पहेलवान यांचाही शोध घेत आहे. या लोकांचे मानकापूर येथील एका अधिकारी आणि हवालदाराशी चांगले संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांनीच भूपेश सोनटक्के प्रकरणाची दिशा बदलवून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. ते फरार आरोपींना मार्गदर्शन करीत आहेत.
तसेच ग्वालबन्सी प्रकरणाच्या तपासासाठी गठित करण्यात आलेल्या एसआयटीमधील तीन अधिकारी यापूर्वीच ग्वालबन्सीच्या समर्थनात काम करीत असल्याची चर्चा आहे. या अधिकाऱ्यांचे ग्वालबन्सी कुटुंबाशी जुने संबंध आहेत.
तांत्रिक बाबीत अडकले प्रकरण
नगरसेवक जगदीश ग्वालबन्सीच्या विरुद्ध दाखल प्रकरण तांत्रिक बाबीत अडकले आहे. ज्या जमिनीवर कब्जा केल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ग्वालबन्सीने त्या जमिनीचे मनपाचे स्लम प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यामुळे दस्तऐवज आणि जमिनीची पाहणी केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यानंतरच पुढची कारवाई केली जाईल. जगदीश ग्वालबन्सीचा दावा खरा ठरल्यास पोलिसांना माघार घ्यावी लागू शकते. त्याचप्रकारे नगरसेवक हरीश ग्वालबन्सीने न्यायालयातून अंतरिम जामीन मिळविला आहे. हरीशच्या जामीन अर्जावर ११ मेला सुनावणी आहे.
समर्थक सुखावले
ग्वालबन्सी प्रकरण उघडकीस आणणारे झोन दोनचे डीसीपी आर. कलासागर यांना आज कार्यमुक्त करण्यात आल्याने ग्वालबन्सी समर्थक सुखावले असून त्यांनी आनंद साजरा केल्याची माहिती आहे. कलासागर यांची बदली अकोलाचे पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे. ते सुटीवर होते. सोमवारी सकाळी ते परत येताच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्याचा अतिरिक्त कार्यभार डीसीपी दीपाली मासिरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम हे स्वत: लक्ष ठेवून आहेत, हे विशेष.