धनवटे कॉलेजच्या प्राचार्यपदी अपात्र उमेदवाराची नियुक्ती :रवींद्र शोभणे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:39 PM2019-08-27T23:39:00+5:302019-08-27T23:40:13+5:30

श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित स्थानिक धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्यपदी नियुक्त झालेले डॉ. सुरेंद्र रामचंद्र जिचकार यांची नियुक्ती अपात्र असल्याचा आरोप डॉ. रवींद्र शोभणे व डॉ. एस.एम. वानखेडे यांनी केला आहे.

Appointed of ineligible candidate for Dhanwate College's Principal : Ravindra Shobhane's allegation | धनवटे कॉलेजच्या प्राचार्यपदी अपात्र उमेदवाराची नियुक्ती :रवींद्र शोभणे यांचा आरोप

धनवटे कॉलेजच्या प्राचार्यपदी अपात्र उमेदवाराची नियुक्ती :रवींद्र शोभणे यांचा आरोप

Next
ठळक मुद्देसहसंचालकांचा आक्षेप असतानाही विद्यापीठाने दिली मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित स्थानिक धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्यपदी नियुक्त झालेले डॉ. सुरेंद्र रामचंद्र जिचकार यांची नियुक्ती अपात्र असल्याचा आरोप डॉ. रवींद्र शोभणे व डॉ. एस.एम. वानखेडे यांनी केला आहे. नियमानुसार डॉ. जिचकार यांचा शैक्षणिक अनुभव १५ वर्षांपेक्षा कमी असतानाही कोणत्याही तक्रारींची दखल न घेता त्यांना समोर ठेवूनच प्राचार्य पदाच्या निवडीची प्रक्रिया राबविल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. उच्च शिक्षण सहसंचालकांनी त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला असताना विद्यापीठाने परवानगी कशी दिली, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मंगळवारी एका पत्रपरिषदेदरम्यान डॉ. शोभणे व डॉ. वानखेडे यांनी याबाबत आरोप केले आहे. त्यांनी सांगितले, या महाविद्यालयातील डॉ.जिचकार यांची नेमणूक जुलै २००० साली झाली होती. यादरम्यान १ सप्टेंबर २००८ ते ८ मे २०१३ या काळात ते अनुक्रमे अभ्यासरजा व त्याला लागूनच विशेष असाधारण रजेवर गेले होते. हा त्यांच्या सुट्यांचा काळ त्यांच्या एकूण शैक्षणिक अनुभवातून वजा करून त्यांची पदनिश्चिती करण्याचे आदेश उच्च शिक्षण सहसंचालकांनी संस्थेला दिले आहेत. त्यांचा सुट्यांचा काळ वजा करता त्यांची सेवा नियमानुसार १५ वर्षांची होत नाही. त्यांनी घेतलेल्या अभ्यासरजेमध्ये कुठलेही संशोधन केले नाही. अभ्यासरजेत केलेल्या अभ्यासाबद्दल कुठलीही माहिती संस्थेकडे उपलब्ध नाही. परंतु अभ्यासरजेचा काळ आपल्या शैक्षणिक अनुभवात ग्राह्य धरीत आपल्या संबंधाच्या बळावर त्यांनी प्राचार्यपद मिळवून घेतल्याचा आरोप डॉ. शोभणे यांनी केला.
या महाविद्यालयात प्राचार्यपदाच्या निवड प्रक्रियेत सुरुवातीपासूनच संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. जिचकार यासाठी पात्र नसल्याची जाणीव संस्थेला होती. त्यांच्यासाठी आधी डॉ. चंगोले यांची निवड प्रथम क्रमांकावर केली. डॉ. चंगोले यांचा एपीआय (अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर) चारशेच्या आत असूनही आणि तो तपासण्याचा अधिकार संस्था सचिवांना नसतानाही डॉ. चंगोले यांचा एपीआय त्यांनी तपासला. त्यानंतर ‘एपीआय पुरेसा नाही म्हणून प्राचार्यपदाच्या निवडीसाठी माझा विचार करण्यात येऊ नये’, असे शपथपत्रही त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले. त्यानंतर निवड समितीने दुसऱ्या क्रमांकावर निवड केलेल्या डॉ. जिचकार यांच्या नावाचा प्रस्ताव संस्थेने विद्यापीठाकडे पाठविला.
दरम्यान, उच्च शिक्षण सहसंचालकांनी डॉ. जिचकार यांच्या अनुभवाच्या अर्हतेवर आक्षेप घेतला होता व त्यासंदर्भातील पत्र संस्थेलाही पाठविले होते. परंतु त्या पत्राची कुठलीही दखल न घेता संस्थेने डॉ. जिचकार यांचा प्रस्ताव विद्यापीठाक डे पाठविल्याचा आरोप डॉ. शोभणे यांनी केले. यासंदर्भात विद्यापीठालाही तक्रारी केल्या आहेत, चौकशीची मागणीसुद्धा केली आहे. डॉ. जिचकार यांनी निवड समितीलाही खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला.
ज्यांचा शैक्षणिक अनुभव १५ वर्षांपेक्षा अधिक होता, ज्यांचा एपीआय हा चारशेपेक्षा कितीतरी अधिक होता, त्याशिवाय संशोधनाचा अनुभव प्रकाशित साहित्याचा अनुभव अधिक होता, अशा नऊ उमेदवारांना डावलण्यात आले व ज्यांची प्राथमिक अर्हता नाही अशा उमेदवाराची नियुक्ती प्राचार्यपदी करण्यात आल्याचे सांगत, यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या दोन्ही संस्था जबाबदार असल्याचा आरोप डॉ. शोभणे यांनी यावेळी केला.
प्राचार्य म्हणून ज्या अटींची व नियमांची पूर्तता करणे गरजेचे असते तीच डॉ. जिचकार पूर्ण करीत नाही. त्यांचा अनुभव १५ वर्षांचा नाही व उच्च शिक्षण सहसंचालकांनी त्यांच्या शैक्षणिक अनुभवावर बोट ठेवले आहे. तथापि, जिचकार यांनी आपल्या शैक्षणिक अनुभवाची सत्य परिस्थिती लपवून प्राचार्यपद पदरात पाडून घेतले. उच्च शिक्षण सहसंचालकांची अनुमती नसताना विद्यापीठाने आंधळेपणाने कागदपत्रांची तपासणी न करता अनुमती दिली. घेतलेल्या आक्षेप व तक्रारींची कुठलीही दखल संस्थेने व विद्यापीठाने घेतली नाही.
- डॉ. रवींद्र शोभणे
काही लोकांनी माझ्या नियुक्तीवर विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संचालकांकडे तक्रार केली होती व या दोन्ही संस्थांनी पूर्ण तपास करून माझ्याविरोधातील आक्षेप खारीज केले आहेत. प्राचार्य पदाच्या निवड प्रक्रियेत विविध संस्थांचे जबाबदार सदस्य सहभागी होते व त्यांनी दिलेल्या नियुक्तीनुसार मी १० तारखेला पदावर रुजू झालो आहे. याउपरही कुणाला आक्षेप असेल त्यांनी हायकोर्टात जावे.
- डॉ. सुरेंद्र जिचकार

Web Title: Appointed of ineligible candidate for Dhanwate College's Principal : Ravindra Shobhane's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.