ऊर्जा विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती रद्द होणार; ऊर्जामंत्र्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:41 AM2020-05-29T11:41:43+5:302020-05-29T11:42:05+5:30
ऊर्जा विभागातील तिन्ही कंपनीत ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याची समीक्षा करून त्या तातडीने रद्द कराव्या, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऊर्जा विभागातील तिन्ही कंपनीत ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याची समीक्षा करून त्या तातडीने रद्द कराव्या, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी उपरोक्त आदेश दिले. मागासवर्गीयांना पदोन्नती देण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करावी आणि महावितरणची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन मनुष्यबळाची भरती करावी, असे आदेशही यावेळी दिले.
शासनाच्या विविध विभागात अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरून तरुणांना संधी देण्याऐवजी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा घेतली जात असल्याकडे लोकमतने लक्ष वेधले होते. याची दखल राऊत यांनी घेतली.
वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे करा, वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळालीच पाहिजे, यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवा तसेच ज्या ठिकाणी अधिकाºयांची-कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता दिसून येत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करा. वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा मिळत नाही, ही गंभीर बाब आहे. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सक्रियपणे कामे करावी, ज्या संस्थांकडे ही कामे दिली आहेत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करा, कामांची गुणवत्ता तपासा आणि कामे संथपणे होत असेल तर संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाका असे आदेशही त्यांनी दिले.