लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : वेकाेलिच्या सिल्लेवाडा (ता. सावनेर) काेळसा खाण परिसरातून ३५ मीटर आर्मर केबल चाेरून नेणाऱ्या चाेरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साेमवारी (दि. १३) रात्री अटक केली. त्याच्या तीन साथीदारांचा शाेध सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
साबिर सलीम शेख (१९, रा. सिल्लेवाडा झाेपडपट्टी, ता. सावनेर) असेे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी वेकाेलिच्या सिल्लेवाडा काेळसा खाणीतील बंकर क्रमांक-०४ मधील ३५ मीटर आर्मर केबल चाेरीला गेली हाेती. या आर्मर केबलचा वापर कन्व्हेअर बेल्ट चालविण्यासाठी इलेक्ट्रिक पाेल ते स्विच रूम आणि स्विच रूम ते कन्व्हेअर बेल्टपर्यंत वीजपुरवठा करण्यासाठी केला जाताे. यात ३५ मीटर आर्मर केबलची किंमत ४१ हजार रुपये आहे.
ही केबल चाेरीला गेल्याचे लक्षात येताच वेकाेलिचे सहायक सुरक्षा उपनिरीक्षक संजय देवराव कांबळे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. या घटनेचा खापरखेडा पाेलिसांसाेबत स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपासाला सुरुवात केली. ही चाेरी साबिरने केल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला शिताफीने सिल्लेवाडा येथून ताब्यात घेत विचारपूस केली. गुन्ह्याची कबुली देताच त्याला अटक करण्यात आली.
त्याच्याकडून आर्मर केबल जप्त करण्यात आली. या चाेरीत त्याच्यासाेबत अन्य तिघे असल्याचे त्याने सांगितल्याने पाेलीस त्या तिघांचाही शाेध घेत आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. त्याच्याकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक अनिल राऊत, वीरेंद्र नरड, नाना राऊत, अरविंद भगत, शैलेश यादव, प्रणय बनाफर, भाऊराव खंडाते, अमाेल कुथे यांच्या पथकाने केली.