१४ हजार कर्मचाऱ्यांची फौज
By admin | Published: January 4, 2017 01:56 AM2017-01-04T01:56:19+5:302017-01-04T01:56:19+5:30
फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे.
नागपूर : फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. ३८ प्रभागातून १५१ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, १२ तहसीलदार व १३ उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची गरज भासणार आहे. तसेच २८०० मतदान केंद्रावर १४ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
२०११च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाख ४७ हजार ४९४ इतकी आहे. यात अनुसूचित जाती ४ लाख ८० हजार ७५९ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १ लाख ८८ हजार ४४४ इतकी आहे. या आधावर प्रत्येक प्रभागाची सरासरी लोकसंख्या ६४८३४ ठेवण्यात आलेली आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेले अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगकडे करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)
५० हजार मतदार वाढले
सप्टेबर २०१६ पर्यतची मतदार यादी यापूर्वीच जाहीर करण्यात आलेली आहे. गेल्या तीन महिन्यात नागपूर शहरात सुमारे ५० हजार नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात आलेली आहेत. परंतु निवडणूक विभागाकडून अंतिम मतदार यादी जाहीर केल्यानंतरच शहरातील मतदारांची संख्या स्पष्ट होणार आहे.
प्रभागनिहाय मतदार यादी १२ जानेवारीपर्यंत
महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी ५ जानेवारीला पुरवणी मतदार यादी तर १२ जानेवारीपर्यंत प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. यावर १७ जानेवारीपर्यंत आक्षेप स्वीकारण्यात येणार आहे. २५ जानेवारीपर्यंत अंतिम मतदार याची जाहीर केली जाणार आहे.
विभागात ४० उपजिल्हाधिकाऱ्यांची कमी
नागपूर विभागातील भंडारा व गोंदिया जिल्हा वगळता उर्वरित चार जिल्ह्यातील जिल्हा परिषदा, महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. यात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यांचा समावेश आहे. एकाच वेळी निवडणुका होत असल्याने निवडणूक प्रक्रि येसाठी आवश्यक असलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या ४० अधिकाऱ्यांची कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.