नागपुरात ऑनलाइन जुगार अड्डा चालविणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 07:50 PM2020-05-29T19:50:35+5:302020-05-29T20:06:20+5:30
मोबाईलवर व्हॉट्सअॅप बिझनेस ग्रुपच्या नावाखाली मोबाईलमध्ये जुगाऱ्यांचा ग्रुप तयार करून त्यांना ऑनलाईन जुगार उपलब्ध करून देणाऱ्या एका आरोपीला कपिलनगर पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईलवर व्हॉट्सअॅप बिझनेस ग्रुपच्या नावाखाली मोबाईलमध्ये जुगाऱ्यांचा ग्रुप तयार करून त्यांना ऑनलाईन जुगार उपलब्ध करून देणाऱ्या एका आरोपीला कपिलनगर पोलिसांनी अटक केली.
त्याच्या मोबाईलमध्ये शहरातील विविध भागात राहणाऱ्या अनेक जुगाऱ्यांची मोठी यादी असल्याचे समजते.
गुरुप्रीतसिंग अमरजीतसिंग मथारू (वय ३१) असे आरोपीचे नाव असून, तो शेंडेनगर टेकानाका परिसरात राहतो.
आरोपी गुरुप्रीतसिंग याने ऑनलाईन जुगार अड्डा चालविण्याचा अफलातून प्रायोग चालविला आहे. त्याने आपल्या मोबाईलमध्ये जुगाºयांच्या नावाने एक व्हॉट्सअॅप बिझनेसच्या नावाखाली लुडो प्ले अॅण्ड विन नावाचा ग्रुप तयार केला आहे. हे सर्व जुगारी लुडो गेम खेळून त्यावर पैशाची हारजीत करीत असतात. ज्यांना हा जुगार खेळायचा त्यांच्याकडून आधीच गुरुप्रीतसिंग गुगल पे, फोन पे, पेटीएमद्वारे रक्कम स्वत:च्या खात्यात जमा करून घेतो. तो नंतर पैसे जमा करणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या जुगाऱ्याचा मोबाईल नंबर आणि ऑनलाइन लुडो गेमचा कोड पाठवतो. या दोघातील जो कोणी रक्कम जिंकला तो जुगारी आरोपी गुरुप्रीतसिंग याला आपल्या मोबाईलचा स्क्रीन शॉट काढून व्हॉट्सअपवर पाठवत होता. त्यानंतर आरोपी त्याची रक्कम तसेच त्याने जिंकलेल्या रकमेवरचे १० टक्के कमिशन कापून उर्वरित रक्कम जुगार जिंकणाऱ्या जुगाऱ्याला मोबाईलच्या माध्यमातून परत पाठवीत होता. अशाप्रकारे ऑनलाइन लुडो खेळण्याकरिता त्याच्या ग्रुपमध्ये अनेक मेंबर तयार असायचे. गुरुप्रीतसिंग या माध्यमातून रोज लाखो रुपयांची हार-जीत करीत असल्याची माहिती कपिलनगर पोलिसांना मिळाली. त्यावरून ठाणेदार प्रभाकर मते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप राहटे, भारत जाधव, रूपाली साळुंके, हवालदार गणेश बर्डे, नायक आसिफ, शिपाई प्रवीण मरापे, विजय वायदुडे, राहुल नागदेवते यांनी आरोपी गुरुप्रीतसिंगच्या घरी गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास छापा घातला. त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असता त्यात अनेकजण ऑनलाईन लुडो जुगार खेळत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला. त्याने दहा टक्के कमिशनवर आपण ऑनलाईन जुगार चालवीत असल्याचे मान्य केले. त्यामुळे त्याला जुगार कायद्यानुसार पोलिसांनी अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या अनेकांची नावे सापडली आहेत.
अफलातून शक्कल, प्रशंसनीय कारवाई
अशाप्रकारे जुगार अड्डा चालवून रोज लाखोंची हार-जीत करण्याची अफलातून शक्कल गुरुप्रीतसिंगने लढवली होती. त्याची कुणाला माहिती मिळणार नाही, असा आरोपीचा होरा होता; मात्र कपिलनगर पोलिसांनी त्याच्या गोरखधंद्याचा छडा लावून ही प्रशंसनीय कारवाई केली.