नागपुरात बंदिवानांनी साकारल्या कलाकुसरीच्या भेटवस्तू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 10:28 PM2019-10-22T22:28:03+5:302019-10-22T22:29:28+5:30

बंदिवानांच्या कौशल्याचे दर्शन सध्या कारागृह परिसरात लागलेल्या भेटवस्तूंच्या प्रदर्शनातून होत आहे. दिवाळी सणाचे औचित्य साधून खास या उत्सवात उपयोगी पडणाऱ्या भेटवस्तू आकर्षक ठरल्या आहेत.

Artisan gifts made by prisoner in Nagpur | नागपुरात बंदिवानांनी साकारल्या कलाकुसरीच्या भेटवस्तू 

नागपुरात बंदिवानांनी साकारल्या कलाकुसरीच्या भेटवस्तू 

Next
ठळक मुद्देकारागृह परिसरात वस्तूंचे प्रदर्शन : दिवाळी सणातील रंगीबेरंगी पणत्या, शोपीसचे साहित्य

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन हे मध्यवर्ती कारागृहाचे ब्रीदवाक्य होय. याअंतर्गत बंदिवानांकडून लोहारकाम, सुतारकाम, विणकाम व पॉवरलूम आदींचे कार्य करविले जाते. अशा विविध कामातूनच कारागृहात राहणाऱ्या बंदिवानांमधील कलाकौशल्याला चालना मिळते.बंदिवानांच्या याच कौशल्याचे दर्शन सध्या कारागृह परिसरात लागलेल्या भेटवस्तूंच्या प्रदर्शनातून होत आहे. दिवाळी सणाचे औचित्य साधून खास या उत्सवात उपयोगी पडणाऱ्या भेटवस्तू आकर्षक ठरल्या आहेत.
शहराच्या दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त बी.जी. गायकर व सिनेकलावंत राजेश चिटणीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कारागृहातील उद्योगांमध्ये विविध प्रकारच्या व्यावसायिक व रोजगारयुक्त वस्तूंचे प्रशिक्षण बंदिवानांना दिले जाते. या उद्योगातून त्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या लाकडी, लोखंडी, कापडी व इतर शोभेच्या वस्तू रक्षाबंधन, दसरा व दिवाळी आदी सणानिमित्त सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येतात. बंदिवानांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांनी बनविलेल्या वस्तू समाजापर्यंत पोहचाव्यात आणि आपण चांगलं काही केले, ही भावना त्यांच्यात निर्माण व्हावी, हा या उत्पादनामागचा उद्देश कारागृह प्रशासनातर्फे ठेवला आहे. यासाठी कारागृह परिसरात कारागृह निर्मित वस्तूंचे विक्री केंद्र उभारण्यात आले असून, याद्वारे विविध बंदिवानांनी तयार केलेल्या विविध वस्तू वर्षभर उपलब्ध करण्यात येतात. दिवाळी सणानिमित्त अशाच प्रकारचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. यात रंगीबेरंगी पणत्या, हातमागाच्या साड्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शो-पीसच्या वस्तू, दऱ्या, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल अशा अनेक प्रकारच्या आकर्षक वस्तू प्रदर्शनात मांडल्या आहेत. ज्या सामान्य नागरिकांना आकर्षित करतील आणि उपयोगाच्याही ठरतील.
कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, कारखाना व्यवस्थापक राजाराम भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी वसंत वानखेडे, तुरुंगाधिकारी विकास रजनलवार, कमलाकर मिरासे, आनंद कांदे, दयानंद सोरटे, देवराव आढे, प्रशासन अधिकारी बी.पी. चव्हाण, शिक्षक योगेश पाटील आदी अधिकारी व कर्मचारी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.

Web Title: Artisan gifts made by prisoner in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.