लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल दीड वर्षापासून कोरोना निर्बंध झेलत असलेल्या सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंतांनी, सोमवारी क्रांतिदिनी रंगमंचावरील पहिली घंटा वाजविण्यासाठी शांततापूर्वक एल्गार पुकारला. कलावंतांना त्यांचे रंगकर्म करू देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दोन महिन्यापूर्वी नाशिक येथून सुरू झालेल्या रंगकर्मी आंदोलनाचे लोण मुंबईमार्गे राज्यभरात पसरले. त्याच अनुषंगाने ऑगस्ट क्रांतिदिनी शासनापुढे आपल्या वेदना मांडण्याचा निर्धार करण्यात आला. सोमवारी राज्यभरात एकाचवेळी हे आंदोलन हजारो रंगकर्मींनी पुकारले. यात नाट्य कलावंत, चित्रकार, गायक, नर्तक, कीर्तनकार, भजनगायक, वादक आदींसह लोककलावंतांचा सहभाग होता. नागपुरात संविधान चौकात हजाराेंच्या संख्येने रंगकर्मी एकवटले होते. विशेष म्हणजे, रंगमंचावर नऊ रसांचे सादरीकरण करणारे कलावंत यावेळी मनात चीड असली तरी शांत रसाने रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाचे नेतृत्व कोण्या एका संघटनेने किंवा कोण्या सांस्कृतिक नेत्याने नव्हे तर एकीने सर्व रंगकर्मींनी केले. आंदोलनानंतर निवडक नेतृत्वांनी जिल्हाधिकाऱ्यांना नाट्यगृह, सिनेमागृहासकट सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले.
युनिफाॅर्म कोडने वेधले लक्ष
सर्वसाधारणत: आंदोलनात युनिफाॅर्म कोड नसतो. मात्र, रंगकर्मींनी आपले वेगळेपण दाखविण्यासाठी सर्व आंदोलकांना पांढरा कुर्ता धारण करण्यास सांगितला होता. त्या अनुषंगाने एकवटलेले सर्व रंगकर्मी एकसारखेच भासत होते.
‘मी रंगकर्मी’चा मास्क अन् आकर्षक फलक
आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मींनी ‘मी रंगकर्मी’ असे लिहिलेला मास्क धारण केला होता. वेगवेगळ्या मागण्या लिहिलेले फलक रंगकर्मी घेऊन उभे होते. कुठलीही घोषणा नव्हे की आरडाओरड तरी देखील या आंदोलनाबाबत कौतुक व्यक्त केले जात होते. सहभागी प्रत्येक रंगकर्मींची नोंद व निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर प्रत्येकाच्या हातावर वेळोवेळी दिले जात होते. इतर कोणत्याही आंदोलनापेक्षा शासकीय नियम जपण्यामुळे हे आंदोलन वेगळे भासत होते.
‘नटराज’ ठरला चित्तवेधक
आंदोलनस्थळी छोटासा डोम उभारण्यात आला होता. सोबतच एका मॅक्सि ट्रकवर नटराजाची भव्य मूर्ती उभारण्यात आली होती. कलेचे आराध्य दैवत म्हणून येणारा प्रत्येक जण नटराजापुढे नतमस्तक होत होता.
....................