अरुण गवळीला नागपूर कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:31 AM2020-05-29T11:31:27+5:302020-05-29T15:51:20+5:30
कुख्यात डॉन अरूण गवळीने ५ दिवसात नागपूर मध्यवर्ती कारागृहास शरण यावे असा आदेश नागपूर उच्च न्यायालयाने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी कुख्यात डॉन अरुण गवळी याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला. यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याला पाच दिवसाची मुदत देण्यात आली.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गवळीने नागपूर येथे येण्याची परवानगी मिळण्यासाठी सक्षम प्राधिकाºयाकडे २४ तासांत अर्ज सादर करावा व सक्षम प्राधिकाºयाने हा अर्ज मिळाल्यानंतर गवळीला नागपूर येथे येण्यासाठी २४ तासांत परवानगी द्यावी आणि ही परवानगी मिळाल्यानंतर गवळीने पुढील तीन दिवसात नागपूर मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण करावे असे न्यायालयाने सांगितले.
उच्च न्यायालयाने २२ मे रोजी गवळीची पॅरोल मुदतवाढीची तिसरी याचिका फेटाळून त्याला २४ मे रोजी नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गवळी तळोजा कारागृहात गेला होता. परंतु, कोरोनामुळे त्याला कारागृहात प्रवेश देण्यात आला नाही. परिणामी, त्याने चौथ्यांदा पॅरोल मुदतवाढ मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी त्याला वरील आदेश देण्यात आला. पत्नीच्या आजारपणामुळे गवळीला सुरुवातीला ४५ दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार त्याला २७ एप्रिल रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात आत्मसमर्पण करायचे होते. परंतु, लॉकडाऊनमुळे उच्च न्यायालयाने त्याला पहिल्यांदा १० मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर लॉकडाऊन लांबले. परिणामी, न्यायालयाने गवळीच्या पॅरोलमध्ये दुसºयांदा २४ मेपर्यंत वाढ केली होती. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. गवळीतर्फे अॅड. मिर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.