अरुण गवळीला फर्लो मंजूर

By admin | Published: March 3, 2016 03:10 AM2016-03-03T03:10:35+5:302016-03-03T03:10:35+5:30

जन्मठेपेची शिक्षा झालेला मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गुलाब गवळी याला कुटुंबाच्या भेटीसाठी उच्च न्यायालयाचे न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. व्ही. एम. देशपांडे ...

Aruna Gawli Approved the Fellow | अरुण गवळीला फर्लो मंजूर

अरुण गवळीला फर्लो मंजूर

Next


नागपूर : जन्मठेपेची शिक्षा झालेला मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गुलाब गवळी याला कुटुंबाच्या भेटीसाठी उच्च न्यायालयाचे न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. व्ही. एम. देशपांडे यांच्या खंडपीठाने बुधवारी फर्लो (संचित रजा) मंजूर केली.
सुधारित नियमाप्रमाणे फर्लोची मुदत २८ दिवसपर्यंत आहे. त्यामुळे गवळीकडून २८ दिवसांचा फर्लो मागण्यात आला होता. न्यायालयाने फर्लो मंजूर केला. परंतु फर्लोच्या मुदतीचे अधिकार न्यायालयाने कारागृह प्राधिकाऱ्यांकडे सोपविले. प्राधिकाऱ्याने १४ दिवसांची मुदत मंजूर केली आहे. गवळी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याने कारागृह अधीक्षकाकडे फर्लोची मागणी केली होती. परंतु त्याची मागणी फेटाळण्यात आली होती. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. यापूर्वीही त्याने मे २०१५ मध्ये मुलाच्या लग्नासाठी पॅरोल (अर्जित रजा) उच्च न्यायालयामार्फत मंजूर करवून घेतली होती. आईच्या आजाराचे कारण पुढे करून त्याने ही रजा वाढवून घेतली होती.
साकी नाका भागातील भूखंड हडपण्यातून ३० लाखांची सुपारी घेऊन अरुण गवळी आणि टोळीने मार्च २००८ मध्ये घाटकोपर येथील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती.
मोक्का विशेष न्यायालयाने आॅगस्ट २०१२ मध्ये गवळी आणि अन्य ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. प्रारंभी गवळीला नवी मुंबई तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. या ठिकाणाहून त्याचे नागपूरच्या कारागृहाकडे स्थानांतरण करण्यात आले होते. उच्च न्यायालयात अरुण गवळीच्या वतीने अ‍ॅड. अनिल मार्डीकर, अ‍ॅड. मीर नगमान अली, अ‍ॅड. एम. एच. सिरिया, अ‍ॅड. मीर रिजवान अली, अ‍ॅड. रोहन मालवीय यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Aruna Gawli Approved the Fellow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.