नागपूर : लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या मालिकेत उद्या, रविवारी (दि. ८ मे) दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या निमित्ताने दोन मुख्यमंत्री ‘लोकमत’च्या मंचावर येणार असल्याने विदर्भातील राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात दुपारी तीन वाजता आयोजित या कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ‘आम आदमी पार्टी व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका’ या विषयावर आपली भूमिका मांडतील, तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे ‘नव्या पंजाब समोरील आव्हाने’ या विषयावर आपले विचार व्यक्त करतील. यावेळी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा उपस्थित राहतील.
दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी, आरोग्य, शिक्षणासह पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केलेली कामे, तसेच पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारताच भगवंत मान यांनी घेतलेल्या काही निर्णयांची नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा आहे. या दोन्ही मुख्यमंत्र्यांबद्दल सामान्य जनतेत आकर्षण आहे. परिणामी, दोघांच्या व्याख्यानाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. या कार्यक्रमात निमंत्रितांनाच प्रवेश दिला जाणार आहे.