आशिष देशमुख यांचा भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 12:49 PM2018-10-12T12:49:03+5:302018-10-12T12:59:04+5:30
आशिष देशमुख यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे.
नागपूर : मागील काही काळापासून सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील आशिष देशमुख यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. देशमुख यांनी याआधी आमदारकीचा राजीनामा दिला होता. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठविला होता. लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे कयास राजकीय वर्तुळात लावण्यात येत आहेत.
आशिष देशमुख हे काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातून 2014 साली निवडून आले होते. मात्र वर्षभरानंतरच देशमुख यांनी राज्य शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्यांनी नागपूरमध्ये ठिय्या आंदोलनही केले होते. वेगळ्या विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना रोखठोक पत्र पाठविल्यानंतर देशमुख राजीनामा देतील असे अंदाज लावण्यात येत होते, मात्र त्यांनी ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली होती. दरम्यान, देशमुख यांच्या पुढील राजकीय भविष्याबाबत विविध कयास लावण्यात येत असून ते पुढील निवडणूक नेमकी कुठून लढणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.