पैसे मागितले, सायकल घेतली, प्रवास सुरू केला..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 10:03 AM2020-05-15T10:03:24+5:302020-05-15T10:03:44+5:30
लॉकडाऊन संपेल, गाड्या सुरू होतील आणि आपण गावी जाऊ, हा विचार करीत दोन महिने उलटले पण ते झालेच नाही. उलट जवळचे सर्व पैसे संपले. आता राहायचे कसे, खायचे काय असे अनेक प्रश्न पुढे होते. शेवटी घरून पैसे मागविले, त्यातून वेळेवर सायकल विकत घेतली आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास सुरू केला.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन संपेल, गाड्या सुरू होतील आणि आपण गावी जाऊ, हा विचार करीत दोन महिने उलटले पण ते झालेच नाही. उलट जवळचे सर्व पैसे संपले. आता राहायचे कसे, खायचे काय असे अनेक प्रश्न पुढे होते. शेवटी घरून पैसे मागविले, त्यातून वेळेवर सायकल विकत घेतली आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास सुरू केला.
उत्तराखंडचा प्रेम कुमार आणि हिमाचल प्रदेशचे विवेक व अजयकुमार हैदराबाद येथे कंपनीत नोकरीला होते. ८ मे रोजी हैदराबादहून प्रवास सुरू करीत गुरुवारी ते नागपूरला पोहचले. पांजरी टोल नाक्याजवळ प्रशासनाच्या केंद्रावर गाडीची व्यवस्था होईल या आशेने थांबलेल्या या तरुणांना लोकमत प्रतिनिधीने बोलते केले. २० हजार रुपये पगार. मार्च महिन्याचा अर्धा पगार कंपनीने दिला. त्या भरवशावर पुढचे दिवस गेले. खोलीचे भाडे, जेवण व इतर खर्चात जवळचे पैसे संपले. लॉकडाऊन संपेल आणि काम पुन्हा सुरू होईल, ही अशा दिवसागणिक संपुष्टात आली. जवळ पैसे उरले नाहीत. आतापर्यंत घरी पैसे पाठवीत होतो पण आता पैसे मागविण्याची परिस्थिती आली. सोबतचे सर्व तरुण मिळेल त्या साधनाने निघून गेले. आम्ही तिघे जण उरलो. गावी जाण्यास काही वाहन मिळेल ही आशाही संपली. वेळेवर ४५०० रुपये याप्रमाणे तीन सायकल घेतल्या आणि प्रवास सुरूकेला. सोबत शेंगदाणे, बिस्कीट आणि काही इतर खायचे साहित्य घेतले. याच आधारावर पोटाची गरज भागवत इथपर्यंत प्रवास केल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात मिळाली मदत
तेलंगणा संपेपर्यंत कुठेही कोणतीही मदत मिळाली नाही. महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर काही लोकांनी मदत केली. पाणी दिले आणि जेवणही मिळाले. बसने थोड्या अंतराचा प्रवास झाला. त्यामुळे थोडा दिलासा मिळाल्याची भावना प्रेम कुमारने व्यक्त केली.
सायकलमध्ये अडकला जीव!
पांजरा नाक्यावर मध्य प्रदेश सीमेपर्यंत बसची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे उत्तराखंड व हिमाचलसाठी गाडीची विचारपूस केली असता रेल्वे स्टेशनवरून ट्रेन मिळेल असे सांगण्यात आले. पण सायकल घेऊन जाण्यास नकार देण्यात आला. वेळेवर १३,५०० रु. खर्च करून घेतलेल्या नवीन सायकल कशा सोडून द्यायच्या, या विचाराने त्यांच्या जीवाची घालमेल सुरू होती. सायकलने पुढचा प्रवास करण्याचे त्राण अंगात नाही आणि ती सोडायचीही इच्छा नाही. मात्र सायकल नेण्याची व्यवस्था झाली नाही तर गाडी सोडून सायकलनेच गावापर्यंतचा प्रवास करू, अशी व्यथा त्या तरुणांनी मांडली.