दारूच्या नशेत हॉटेलमध्ये महिलांसह ग्राहकांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2023 09:33 PM2023-01-23T21:33:09+5:302023-01-23T21:33:39+5:30
Nagpur News वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या महिला आणि कुटुंबीयांना दारूच्या नशेत असलेल्या एका गुन्हेगाराने मारहाण केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका माजी मंत्र्याच्या नातेवाइकाच्या हॉटेलात ही घटना घडली.
नागपूर : वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या महिला आणि कुटुंबीयांना दारूच्या नशेत असलेल्या एका गुन्हेगाराने मारहाण केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका माजी मंत्र्याच्या नातेवाइकाच्या हॉटेलात ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
सदर येथील रहिवासी असलेल्या दोन महिला शनिवारी रात्री पतीसह अन्य कुटुंबीयांसह हॉटेलमध्ये जेवणासाठी आल्या होत्या. रात्री दीडच्या सुमारास जेवण करून महिला निघण्याच्या तयारीत होत्या. त्याच वेळी अज्जू सिंग नावाचा आरोपी दारूच्या नशेत हॉटेलमध्ये आला. तो नशेत असल्याने पाय अडखळून खाली पडला. त्या वेळी त्याच्या मागे वेटर उभा होता. अज्जूने वेटरवर राग राढला व बाटलीने त्याचे डोके फोडले. यानंतर अज्जू समोरील टेबलवर बसलेल्या महिलेच्या अंगावर पडला. तिच्या पतीने त्याला नीट चालण्याचा सल्ला दिला. यावरून अज्जूने महिला व तिच्या पतीला मारहाण केली. तसेच त्यांच्या शेजारी बसलेल्या आणखी एका दांपत्यालादेखील मारहाण केली. हे पाहून हॉटेलचे बाऊन्सर्स धावले आणि त्यांनी अज्जूसह त्याचा भाऊ रणवीरसिंग व आणखी एकाला बाहेर काढले. काही वेळाने तिघेही परतले व त्यांनी इतर ग्राहकांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने हॉटेल गाठले. तोपर्यंत पीडित दाम्पत्य तेथून निघून गेले होते. तर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी असे काहीच झाले नसल्याचा दावा केला.
गुन्हे शाखेत कार्यरत भावाकडून दबाव?
दरम्यान, रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित व्यक्तीने सोनेगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. एवढी गंभीर बाब असल्यावरदेखील पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींचा भाऊ नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत आहे व त्याच्या दबावामुळे दखलपात्र गुन्ह्याची नोंद झालेली नाही.