नागपूर : २०१६-१७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेली अटल भूजल योजना महाराष्ट्रात तब्बल चार वर्षांनी राबविली जात आहे. २०२५ पर्यंत या योजनेतून कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून प्राथमिक स्तरावरील कामासाठी राज्याला १६.८३ कोटी रुपयांचा निधीही मिळाला आहे. राज्यातील ७३ शोषित पाणलोट क्षेत्रातील १,४४३ गावांमध्ये या योजनेतून काम केले जाणार आहे.
महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमधील ३८ तालुक्यांमध्ये असलेल्या १,४४३ गावांमध्ये या योजनेच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. या योजनेसाठी ९२५.७७ कोटी रुपयांची आर्थिक तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह सात राज्यात केंद्र सरकार आणि जागतिक बँकेच्या माध्यमातून प्रत्येकी ५० टक्के वाट्यामधून यासाठी काम केले जाणार आहे. राज्यातील कामासाठी अलिकडेच पहिल्या टप्प्यात १६.८३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यातून योजनेतील गावांचे पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून कृती आराखडे बनविण्याचे काम प्राथमिक टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यात या योजनेतून काम होणार आहे.
...
येथे राबविणार योजना
जिल्हा - तालुके - पाणलोट क्षेत्र - गाव
पुणे - ३ - ५ - ११८
सातारा - ३ - ३ - ११४
सांगली - ४ - ६ - ९३
सोलापूर - ४ - ५ - ११७
नाशिक - २ - ९ - १२९
अहमदनगर - ३ - ६ - १०९
जळगाव - ४ - ६ - १०१
जालना - ३ - ५ - ५०
लातूर - ४ - ९ - १३६
उस्मानाबाद - २ - ७ - ५५
अमरावती - ३ - ६ - २१७
बुलडाणा - १ - ४ - ६८
नागपूर - २ - २ - १२३
एकूण - ३८ - ७३ - १,४४३
...
कोट
योजनेत समाविष्ट असलेल्या राज्यातील गावांमध्ये गावपातळीवर आराखडे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. भू-वैज्ञानिकांचे प्रशिक्षणही यासाठी सुरू झाले आहे. २०२५ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शोषित नोंद असलेले पाणलोट सुरक्षितमध्ये परावर्तित करण्याचे प्रयत्न यातून होणार आहेत.
- मल्लिनाथ कलशेट्टी, संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा
...