संतसाहित्याला माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी; नितीन गडकरी यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 04:54 PM2019-08-18T16:54:47+5:302019-08-18T16:55:17+5:30
संत साहित्यांच्या अभ्यासकांनी आपल्या संशोधनांना आणि संत साहित्यांना माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी. सरकार सहकार्य करेल असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतिहास, संस्कृती आणि वारसा ही आपली ताकद आहे. यात महाराष्ट्रातल्या संतांचे मोठ्ठे योगदान असून, ही ताकद पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि भविष्य संस्कारित व्हावी असे वाटत असेल तर, संत साहित्याचे डिजिटलाईजेशन होणे ही काळाची गरज आहे. संत साहित्यांच्या अभ्यासकांनी आपल्या संशोधनांना आणि संत साहित्यांना माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी आणि त्यासाठी आचार्य म. रा. जोशी यांनी पुढाकार घ्यावा.. सरकार त्यांना सहकार्य करेल असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ संत साहित्याचे गाढे अभ्यासक आचार्य डॉ. म. रा. जोशी यांना गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी, ते बोलत होते. रविवारी सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, खा. डॉ. विकास महात्मे, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर सचिव शैलेश जाधव, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे प्रभारी संचालक मीनल जोगळेकर, डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे उपस्थित होते.
संत साहित्य समाजाला दिशा देणारे आणि मनावर संस्कार करणारे आहे. या साहित्यांतून महाराष्ट्राची सुसंस्कृत पिढी निर्माण झाली आहे. अशा साहित्याचे संशोधन करणाऱ्या डॉ. म.रा. जोशी यांची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली, हे कौतुकास्पद आहे. जोशी यांचा हा सन्मान म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा गौरव ठरला आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम आणि अन्य संतांच्या साहित्यातील चिंतन हे जगतानाला मार्गदर्शक ठरणारे असून, त्यांचे विचार जगाच्या कानाकोपºयात पोहोचवायचे असतील तर त्याला माहिती तंत्रज्ञानाची जोड देणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. दरवर्षी पंढरपूरला निघणाºया वारीतून अध्यात्मीत वातावरणाचे उत्सर्जन होत असते. या वारीसाठी आठ हजार कोटी रुपये खर्चुन देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर वारकरी पालखी मार्ग बांधण्यात येत आहे. त्याचे भूमीपुजन याच महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझ्या उपस्थिती पार पडणार असल्याचे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. संचालन रेणूका देशकर यांनी केले. तर आभार श्रीराम पांडे यांनी मानले.