लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव कारचालकाने चाैकात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायाला चिरडण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना शताब्दी चौकात शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. कारची धडक लागून गंभीर जखमी झालेल्या पोलीस शिपायाचे नाव नितीन वरठी असून ते खासगी इस्पितळात अतिदक्षता कक्षात दाखल आहेत.
वाहतूक शाखा अजनीच्या भरारी पथकात कार्यरत असलेले नितीन वरठी शनिवारी सकाळी १०.३० वाजता शताब्दी चौकात कर्तव्यावर होते. सिग्नल बंद असताना चौकाच्या मधोमध एक कार येऊन थांबली. कारला समोर नंबरप्लेट नसल्याने वरठी यांनी कारच्या समोर जाऊन चालकाला कार बाजूला घेण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने अचानक गती वाढवून कार वरठी यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. जोरदार धडक लागल्याने वरठी फुटबॉलसारखे उसळून डोक्याच्या भारावर पडले. या घटनेमुळे चौकात प्रचंड थरार निर्माण झाला. जखमी पोलीस रस्त्यावर पडलेला असताना आरोपी कारचालक तेथून पळून गेला. आजूबाजूच्यांच्या मदतीने वरठीला देवनगरातील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. दरम्यान, कारचालकाने वाहतूक शिपायाला चिरडण्याचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताने शहरात एकच खळबळ उडाली. एएसआय गजानन साधनकर यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.
आरोपीच्या शोधासाठी दोन पथके
पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी कारचालकाचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. एका पथकाने मानेवाडा ते प्रतापनगर मार्गावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालवले आहेत. तर, दुसऱ्या पथकाने कार विक्रेत्यांकडून एवढ्यात पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सान कार कुणाकुणाला विकली, त्याचा शोध चालविला आहे. लवकरच आरोपी आमच्या ताब्यात येईल, असा दावा ठाणेदार विनोद चाैधरी यांनी केला आहे.