नागपुरात मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मोबाईलवरून आईला कळवल्याने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 03:09 PM2018-04-05T15:09:25+5:302018-04-05T15:09:42+5:30
घरात एकटी मुलगी असल्याचे पाहून हुडकेश्वरमधील एका वस्तीतील आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने मोबाईलवरून आईला कळवताच ती घरी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरात एकटी मुलगी असल्याचे पाहून हुडकेश्वरमधील एका वस्तीतील आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने मोबाईलवरून आईला कळवताच ती घरी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आरोपीने मुलीला आणि तिच्या आईला अश्लिल शिवीगाळ केली. तर, मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी ११.३० ते दुपारी १. २० दरम्यान ही घटना घडली.
अतूल सूर्यवंशी (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. तो जेथे राहतो. त्याच वस्तीत पीडित परिवारातील सदस्य राहतात. मुलगी (वय १७) अकरावीला शिकते. कॉलेज आणि ट्यूशनला जातेवेळी तिचा आरोपी अतुल नेहमी पाठलाग करायचा. तिच्याशी तो सलगी साधण्याचा प्रयत्न करत होता. या मुलीने काही दिवसांपूर्वी ही बाब आपल्या आईवडीलांना सांगितली. त्यावरून मुलीच्या आईने त्याच्या घरी जाऊन त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी ११.३० मुलीचे आईवडील कामावर गेले होते. ती घरात एकटीच असल्याचे पाहून आरोपी तिच्या घराकडे आला. ते पाहून मुलीने आपले दार लावून घेतले. आरोपीने दार उघडावे म्हणून मुलीला दमदाटी केली. तिने दार उघडले नाही म्हणून अश्लिल शिवीगाळ केली. मुलीने आपल्या आईला मोबाईलवर संपर्क करून हे सर्व सांगितले. लगेच मुलीची आई घरी पोहचली. त्यांना पाहून आरोपी पळू लागला. मुलीच्या आईने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ करून मुलीला आणि तुझ्या पतीला ठार मारेन, अशी धमकी दिली. महिलेने हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी अतुल सूर्यवंशीचा शोध घेतला जात आहे.
आरोपी दारूड्या, उपद्रवी
आरोपी अतुल सूर्यवंशी हा उपद्रवी म्हणूनच परिसरात कुख्यात आहे. तो दारूड्या आहे. त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास आहे. त्याने बुधवारी भरदिवसा केलेल्या या संतापजनक प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून, त्याला तातडीने अटक करावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.