लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आणि दोन चिमुकल्यांना त्यांच्या घरात बंद करून अज्ञात समाजकंटकाने मागच्या आणि पुढच्या दाराला आग लावली. प्रसंगावधान राखत शेजाऱ्यांनी लगेच दोन्ही दाराची आग विझवून मायलेकांना बाहेर काढल्याने त्यांचे जीव वाचले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पहाटे ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले नायक शिपाई राहुल चव्हाण एमआयडीसीतील एसआरपीएफ कॅम्पमागे असलेल्या सप्तकनगरात राहतात. सध्या त्यांची ड्युटी वानाडोंगरीतील आयटीआय कोविड सेंटरमध्ये आहे. सोमवारी रात्री ते आपल्या कर्तव्यावर गेले. घरात राहुलची पत्नी पूनम (वय २९) तसेच राघव (वय ६ वर्षे) आणि केशव (वय ३ वर्षे) झोपून होते. पहाटे २.३० च्या सुमारास घरात धूर निर्माण झाल्यामुळे त्यांना जाग आली. गुदमरल्यासारखे वाटत असल्याने त्यांनी दाराकडे धाव घेतली; मात्र दाराची कडी बाहेरून लावून होती. मागच्या दाराचीही अशीच अवस्था होती आणि दोन्ही दाराला आग लागल्याने आतमध्ये धूर येत होता. पूनम यांनी खिडकी उघडून जोरजोराने शेजाऱ्यांना मदतीसाठी हाक दिली. आरडाओरड ऐकून शेजारी जागे झाले. चव्हाण यांच्या दाराला आग लागल्याचे पाहून त्यांनी लगेच पाणी टाकून आग विझविली. त्यानंतर दाराची कडी उघडून पूनम आणि त्यांच्या दोन्ही मुलांना बाहेर काढण्यात आले. या प्रकारामुळे तिघेही मायलेक भेदरले होते. दरम्यान, पूनम यांनी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून एमआयडीसी पोलिसांना माहिती कळविली. रात्रपाळीवर असलेले सहायक निरीक्षक शशिकांत मुसळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी वरिष्ठांना माहिती कळविली. पोलीस आणि शेजाऱ्यांनी पूनम यांना धीर दिला. त्यानंतर पोलिसांनी पूनम यांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या थरारक घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
---
कोणत्या वादाची परिणती ?
पोलिसांना चव्हाण यांच्या दोन्ही दारांवर रॉकेलने भिजविलेले बोळे आढळले. या घटनेतील आरोपी कोण आणि कोणत्या कारणावरून त्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या दोन निरागस मुलांसह पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, चव्हाण यांच्याशी काही दिवसांपूर्वी एकाचा वाद झाला होता, त्यावरून ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. चव्हाण यांनाही विचारपूस केली जात आहे. आरोपींना लवकरच अटक करू असा पोलिसांचा विश्वास आहे.
---