नागपूर : जरीपटक्यात आरोपींनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु आग लागल्यामुळे आरोपी तेथून पळून गेले. ही घटना गुरुवारी पहाटे जरीपटकाच्या मेकोसाबाग कब्रस्तान मार्गावर घडली आहे.
मेकोसाबाग कब्रस्तान रोडवर कॅनरा बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजता दुचाकीवर स्वार तीन युवक तेथे आले. त्यांच्या जवळ गॅस कटर, सिलींडर आणि एटीएम कापण्यासाठी लागणारे विविध उपकरणे होती. त्यांनी एटीएमच्या सीसीटीव्हीवर कपडा टाकला. त्यानंतर गॅस कटर आणि इतर उपकरणांच्या साह्याने मशीन कापत होते. खुप खटाटोप केल्यावर आरोपी एटीएमच्या लॉकरपर्यंत पोहोचले. दरम्यान एटीएममध्ये आग लागली.
आग विझविणे शक्य नसल्यामुळे पकडल्या जाण्याच्या भितीने आरोपी तेथून फरार झाले. सकाळी ९ वाजता पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात आरोपी ११ वाजता परिसरात फिरत असल्याचे दिसले. त्यांनी बराच वेळ एटीएम आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर पहाटे ३ वाजता चोरी करण्यासाठी दुचाकीवर ट्रिपल सीट आले. यातील एक आरोपी सरदार आहे. दुचाकीचा नंबर न मिळाल्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. जरीपटका पोलिसांनी चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.