लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवाई मार्गाने विदेशातून बेकायदेशीररीत्या विविध वस्तू घेऊन येणाऱ्यांवर केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर विभागाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’चे बारीक लक्ष असते. साधारणपणे हवाई मार्गाने सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू जास्त प्रमाणात बेकादेशीरपणे आणल्या जातात. परंतु मागील पाच वर्षांत या वस्तूंसह चक्क ‘ड्रोन’ अन् विदेशी मद्याच्या ‘स्मगलिंग’चादेखील प्रयत्न झाला. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत केंद्रीय उत्पादन, सीमा शुल्क व सेवाकर कार्यालयाकडे विचारणा केली होती. मार्च २०१९ ते जुलै २०२१ या कालावधीत कार्यालयाच्या ‘एअर कस्टम्स युनिट’ने अनधिकृतपणे आणण्यात येणाऱ्या किती वस्तू पकडल्या, किती मुद्देमाल जप्त झाला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१९ ते जुलै २०२१ या कालावधीत हवाई मार्गाने आलेल्या ७१ लाख ९५ हजार ८९९ रुपयांच्या बेकायदेशीर वस्तू जप्त करण्यात आल्या. यात ड्रोन, विदेशी मद्य यांचा प्रामुख्याने समावेश होता.
दरम्यान, हवाई मार्गाने अनधिकृतपणे सोने आणण्याचादेखील प्रयत्न झाला. २०१३ ते जानेवारी २०२० या कालावधीत ४ कोटी ९६ लाख ७२ हजार ९६० इतक्या किमतीचे सोने जप्त करण्यात आले होते.
कोरोनाकाळात कारवाई नाही
२०१९-२० या कालावधीत सर्वाधिक ६६ लाख ९८ हजार ६८३ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तर २०२०-२१ मध्ये ४ लाख ९७ हजार २१६ रुपयांचा माल जप्त झाला. २०२१-२२ मध्ये एकही कारवाई झालेली नाही. १० जानेवारी २०२० ला सर्वाधिक ३२ लाख ८७ हजार ८० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.