आॅटोचा काच फुटला, हिंमत नाही तुटली!
By admin | Published: October 16, 2015 03:16 AM2015-10-16T03:16:43+5:302015-10-16T03:16:43+5:30
सध्या नवरात्र सुरू आहे. स्त्रीला आदिशक्ती म्हणून गौरविणारा हे पर्व आहे. परंतु मंदिरात दुर्गेची पूजा बांधणाऱ्यांचा दुर्गेचेच रुप ...
पुरुषी मानसिकतेचे घाव : नवरात्र पर्वातही स्त्रीच्या नशिबी संघर्षच
मंगेश व्यवहारे नागपूर
सध्या नवरात्र सुरू आहे. स्त्रीला आदिशक्ती म्हणून गौरविणारा हे पर्व आहे. परंतु मंदिरात दुर्गेची पूजा बांधणाऱ्यांचा दुर्गेचेच रुप असलेल्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदललेला दिसत नाही. याचा प्रत्यय नुकताच आॅटोचालक बबिता रामटेके यांना आला. दुर्धर आजाराने नवऱ्याला ग्रासल्यामुळे बबिता रामटेके या महिलेने कुटुंबाचा गाढा ओढण्यासाठी आॅटोचे सारथ्य पत्करले. परंतु पुरुषी मानसिकतेच्या आॅटोचालकांनी तिचा टिकाव लागू दिला नाही.
आठवड्याभरापूर्वी एका गुंड प्रवृत्तीच्या आॅटोचालकाने तिच्यावर हल्ला करून आॅटोची तोडफोड केली. तेव्हापासून तिचा आॅटो घरीच पडला आहे. तिचा रोजगारच हिरावल्याने तिच्यापुढे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आॅटो फुटला तरी या माऊलीने हिंमत हारली नाही.न्यू कैलास नगरातील एका किरायाच्या घरात बबिता रामटेके या राहतात. त्यांचे पती ईश्वर हे आॅटोचालक होते. तीन वर्षापूर्वी त्यांना ‘पॅरालिसिस’ आजाराने ग्रासल्याने ते पलंगावर पडून आहे. मोठी मुलगी जवळच्याच एका शाळेत ११ व्या वर्गात शिकते. परिस्थितीमुळे मुलाला वसतिगृहाते टाकले आहे. नवऱ्याच्या आजारपणात होता तेवढा पैसा खर्च झाल्याने, कुटुंबाची परिस्थिती अतिशय बेताची झाली आहे. सुरूवातीला कुटुंबाला आधार देण्यासाठी बबिताने दोन घरची धुणीभांडी केली. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या बबिताच्या मानसिकतेला धुणीभांडी करणे काही पटले नाही. त्यामुळे नवऱ्याचा घरी पडलेला आॅटो चालविण्याचे तिने ठरविले. तिने आॅटो चालविण्याचे प्रशिक्षण घेतले, परवानाही काढला. वर्षभरापासून ती आॅटो चालवायला लागली. महिला प्रवाशांकडून तिला चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे नवऱ्याचा जुना आॅटो विकून नवीन आॅटो घेतला. परंतु या पुरुषी मानसिकतेच्या व्यवसायात तिला प्रचंड त्रास झाला. कुठल्याही आॅटो स्टॅण्डवर तिला आॅटो लावण्याची परवानगी दिली नाही. स्टॅण्डपासून दूर कुठेतरी उभी राहून ती व्यवसाय करू लागली. आॅटोचालक तिचे मानसिक खच्चीकरण करू लागले. रस्त्यावर आॅटो उभा राहिल्यास तिला पळवून लावत होते. तू आॅटो चालवू नको, आॅटो आम्हाला भाड्याने दे, असा तगादा तिच्या मागे लावत होते. पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी देऊ लागले. अखेर ७ आॅक्टोबरला एसटी स्टॅण्डजवळ एका गुंड आॅटोचालकाने तिच्या आॅटोवर हल्ला करून आॅटोची काच फोडून टाकली.
तेव्हापासून आॅटो घरीच पडला आहे. रोजगार हिरावल्याने ती हतबल झाली आहे. नातेवाईकांसह समाजानेही तिच्याकडे पाठ फिरविली आहे. आपली अवस्था लोकमतच्या प्रतिनिधीपुढे व्यक्त करताना तिला गहिवरून आले होते.
नाही सांगायचे आमचे दु:ख तुम्हाला
आॅटोची तोडफोड केल्यानंतर कार घेऊन घरापर्यंत पत्रकार आले. आईचा इंटरव्ह्यू घेतला. पेपरमध्ये, टीव्हीमध्ये आमची परिस्थिती दाखविली. पण काहीच झाले नाही. साधी आॅटोची फुटलेली काच लावून देण्यासाठी कुणीही मदत केली नाही. आता परत तुम्हाला आमचे दु:ख सांगायचे नाही. तुम्ही जा, आम्ही आमचे पाहून घेऊ, आपला संताप बबिताच्या मुलीन व्यक्त केला.
कुटुंबाच्या पोटासाठी करावे लागते
तीन वर्षांपासून नवरा पलंगावर पडला आहे. पोरांचे शिक्षण करायचे आहे. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी सर्व धडपड सुरू आहे. आॅटोचा काच फुटल्याची पोलिसात तक्रार केली आहे. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. आठवड्याभरापासून आॅटो घरी पडला आहे. घरभाडे थकले आहे. आॅटोची किस्त देणे बाकी आहे. घरात खाण्याचे वांदे झाले आहे. काच लावण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करीत आहे. पोलिसांची थोडी मदत झाल्यास आणि एखाद्या आॅटो स्टॅण्ड मिळाल्यास खूप मदत होईल.
मदतीतच खरी भक्ती
स्त्रीला आपण देवीचे रुप मानतो. दुर्गा उत्सवात तिची पुजा करतो. श्रद्धेपोटी दानधर्म करण्यात येतो. यातून समाधान मिळत असले तरी, हे सर्व प्रतिकात्मक आहे. प्रत्येक स्त्री ही दुर्गेचे रूप आहे. त्यामुळे तिचा सन्मानही होणे गरजेचे आहे. काही समाजकंटकांमुळे ती अडचणीत आली असेल, अशावेळी तिच्या पाठीशी उभे राहून, तिला मदत करण्यातच खरी भक्ती, समाधान आहे.