नागपुरात ऑटोचालकाने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 11:06 PM2019-09-03T23:06:20+5:302019-09-03T23:07:56+5:30
क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झाल्याने एका ऑटोचालकाने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारीदुपारी ४.३० वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर सावरबांधे ले-आऊट परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झाल्याने एका ऑटोचालकाने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारीदुपारी ४.३० वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर सावरबांधे ले-आऊट परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. संजय वामनराव इंगळे (वय ५०, रा. सावरबांधे ले-आऊट) असे मृताचे नाव आहे.
संजय इंगळे ऑटो चालवायचा. चार वर्षांपूर्वी त्याला क्रिकेटवर सट्टा लावण्याचे व्यसन जडले. त्यामुळे ऑटोतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी बहुतांश रक्कम तो सट्ट्यावरच लावायचा. काहीवेळा तो सट्टा जिंकला. त्यामुळे त्याला सट्ट्याच्या व्यसनाने घट्ट विळखा घातला. तो घरून ऑटो घेऊन निघायचा अन् सटोड्यांकडे जाऊन बसायचा. ऑटो चालविणे बंद केल्याने आणि मोठी रक्कम हरल्याने त्याला खर्च भागविणेही शक्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रारंभी होते नव्हते ते विकले; नंतर मित्र आणि ओळखीच्यांकडून कर्ज घेणे सुरू केले. त्यानंतर त्याने अवैध सावकार आणि एका बँकेतूनही कर्ज उचचले. ही सर्व रक्कम सट्ट्यात हरल्याने त्याच्याकडे कोणतेही पर्याय उरले नाही. दुसरीकडे कर्जदारांचा त्याच्यामागे तगादा लागल्याने संजय त्रस्त झाला. त्याने सोमवारी सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. पत्नी योगिता घरी परतल्यानंतर ही आत्महत्या उघडकीस आली. त्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. हुडकेश्वर पोलिसांनी योगिता संजय इंगळे यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.