नागपूर : अनेक रेल्वेगाड्यांचा ट्रॅक ॲटोमॅटिक संचालित करणारी स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली नागपूर ते गोधनी (६.५५ किमी) दरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रविवारी कार्यान्वित केली. या प्रणालीमुळे सिग्नलच्या स्थितीसह थेट ट्रेनची हालचाल रेल्वे स्थानकांवर आणि विभागीय नियंत्रण कार्यालयातदेखील पाहता येते.
स्वयंचलित सिग्नलिंग ही सर्वांत प्रगत प्रणाली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून अनेक गाड्या विभागांमध्ये चालवल्या जाऊ शकतात. नागपूर-गोधनी हा एक व्यस्त रूट आहे. जेथे इटारसी आणि हावडा या दोन्ही बाजूंकडील सुमारे ५० रेल्वेगाड्या वारंवार धावतात.
सध्याच्या सिग्नलिंग सिस्टीमनुसार दोन स्थानकांदरम्यान एकावेळी एकच ट्रेन संचालित केली जाऊ शकत होती. स्वयंचलित सिग्नलिंगमुळे मात्र दोन स्थानकांदरम्यान अनेक गाड्या चालवल्या जाऊ शकतात. अशाप्रकारे, नवीन प्रणाली लागू झाल्याने अधिक गाड्या नागपूर आणि गोधनी स्थानकावरून सुटतील आणि येतील. परिणामी, नागपूर आणि गोधनी स्थानकांवरील गाड्यांची गर्दी कमी होणार असून स्थानकाबाहेर गाड्या रेंगाळण्याचा प्रकार (प्रतीक्षा वेळ) ही कमी होणार आहे.
ब्लॉकमधील गाड्यांच्या हालचालींवर नियंत्रण
ही प्रणाली स्वयंचलित सिग्नलचा वापर करून ब्लॉकमधील गाड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवेल. नवीन प्रणालीमध्ये दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन स्वयंचलित सिग्नल्स आहेत आणि ऑटो एसएमएस जनरेशनसह चार सेमी-ऑटोमॅटिक सिग्नल आणि एक्सल काउंटर आहेत. ही महत्त्वपूर्ण प्रणाली लागू केल्याबद्दल डीआरएम ऋचा खरे यांनी सिग्नल आणि दूरसंचार विभागाचे काैतुक केले.
चेन्नई-निजामुद्दीन राजधानी ठरली पहिलीनागपूर विभागात स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीवर धावण्याचा पहिला मान रविवारी सायंकाळी चेन्नई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसने मिळवला. एडीआरएम (टेक्निकल) जयसिंग यांच्या उपस्थितीत हे ऑपरेशन झाले. यावेळी वरिष्ठ डीएसटीई आलोक कुमार, वरिष्ठ डीओएम आशुतोष श्रीवास्तव तसेच के. आर. गोपीनाथ, एस. बी. चावडे, आर. एन. देशमुख, एम. के. अवधी हे अधिकारी उपस्थित होते.