नागपुरातील तरुणाई चैत्यभूमीवर करणार मासिक पाळीबद्दल जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:42 AM2018-12-04T10:42:40+5:302018-12-04T10:44:40+5:30
नागपूरच्या तरुणाईने महापरिनिर्वाणदिनी मुंबईच्या चैत्यभूमीवर मासिक पाळीबद्दल जनजागृती करून तसेच गरजू महिलांना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करून महामानवास अभिवादन करण्याचा संकल्प केला आहे.
आनंद डेकाटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते की, ‘एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील स्त्रियांची किती प्रगती झाली, यावरून ती मोजता येईल.’ बाबासाहेबांचे हेच विचार अंगीकृत करून स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागपूरच्या तरुणाईने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. महापरिनिर्वाणदिनी मुंबईच्या चैत्यभूमीवर मासिक पाळीबद्दल जनजागृती करून तसेच गरजू महिलांना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करून महामानवास अभिवादन करण्याचा संकल्प केला आहे.
नागपूरच्या प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेचे अनिकेत कुत्तरमारे, मेघा वानखेडे, उर्वशी फुलझेले, पंकज वासनिक, शितल गडलिंग, नीलेश बागडे, प्रमोद वासनिक आदी तरुण-तरुणींनी एकत्र येऊन हा आगळावेगळा संकल्प केला आहे. ‘पे बॅक टू सोसायटी’ अंतर्गत ‘मासिक पाळी- चला आपण बोलू या‘ हे अभियान ही तरुणाई राबवित आहे. याची सुरुवात सर्वप्रथम दीक्षाभूमीवरून करण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर देशभरातील लाखो बौद्ध अनुयायी येतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. सर्वचजण मासिक पाळीबाबत जागरूकआहेतच असे नाही. दीक्षाभूमीवर राबविण्यात आलेल्या जनजागृती अभियनातही या तरुणाईला असेच अनुभव आले. बहुतांश महिला यावर उघडपणे बोलायलाच तयार नव्हत्या. ‘सॅनेटरी नॅपकिक’बद्दलही त्यांना माहिती नव्हती. दीक्षाभूमीवर महिलांसोबत या विषयावर तरुणी ममोकळेपणाने बोलल्या. गरजू महिलांना सॅनटरी नॅपकिन वितरित केल्या. तोच धागा पकडून आता मुंबईच्या चैत्यभूमीवरही अशाच प्रकारची जनजागृती करण्यात येणार आहे. चैत्यभूमीवर महिलांसोबत या तरुणी मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने बोलतील. तसेच गरजू महिलांना सॅनेटरी नॅपकिन वाटप करतील. यासोबतच दहा हजार भोजनाचे पॅकेटही वितरित करण्यात येणार आहेत.
सोशल मीडियाद्वारे नागपूर-मुंबईची तरुणाई एकत्र
‘पे बॅक टू सोसायटी’ अंतर्गत दीक्षाभूमीवर राबविण्यात आलेल्या सॅनेटरी नॅपकिन्सच्या जनजागृतीबद्दलची माहिती व फोटो नागपूरच्या तरुणांनी सोशल मीडियावर अपलोड केले. तेव्हा त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. विशेषत: तरुणांनी याचे स्वागत केले. यातच मुंबईच्या तरुणाईने याचे विशेष स्वागत करून चैत्यभूमीवरही हे अभियान मिळून राबविण्याबाबत विनंती केली. त्यानुसार मुंबईच्या वैशाली भालेराव, स्वाती भालेराव, आम्रपाली जाधव, अपेक्षा पवार, आम्रपाली घारे, उज्ज्वला दाभाडे, वैभव पोटे, वैभव कंबळे आदी तरुण या अभियानात सहभागी होणार आहेत.