वर्तमानातील कवितांना राजकीय विचारांचे भान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:08 AM2021-01-18T04:08:17+5:302021-01-18T04:08:17+5:30
प्रभा गणोरकर : शरच्चंद्र मुक्तिबोध जन्मशताब्दी काव्यजागर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अलीकडचे कवी वर्तमानसापेक्ष कविता करतात आणि काव्यविश्वासाठी ...
प्रभा गणोरकर : शरच्चंद्र मुक्तिबोध जन्मशताब्दी काव्यजागर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अलीकडचे कवी वर्तमानसापेक्ष कविता करतात आणि काव्यविश्वासाठी ही जमेची बाजू आहे. वर्तमानातील कवितांना राजकीय विचारांचे भान असून, सर्वच विचारक्षेत्रात अभिव्यक्तीची सांगड उत्तमप्रकारे घातली जात असल्याची भावना प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. प्रभा गणोरकर यांनी व्यक्त केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभाग आणि विदर्भ साहित्य संघाच्या वतीने प्रा. शरच्चंद्र मुक्तिबोध जन्मशताब्दी निमित्त आयोजित कवी शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती ऑनलाइन काव्यजागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून प्रभा गणोरकर बोलत होत्या.
या कार्यक्रमाल प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्रा. प्रदीप मुक्तिबोध, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर उपस्थित होते.
काळपरिस्थितीनुरूप वर्तमानात काव्यप्रतिभांना अनन्य कंगोरे असल्याचे दिसून येते. वैचारिक लेणे घेऊन आपल्या अभिव्यक्तीला फुलविताना कवी अतिशय टोकदार शैलित आपल्या काव्यप्रतिभेला चालना देत आहेत. मुक्तिबोधांनी भारतीय साहित्य आणि मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्राला नाकारात स्वतंत्र विचार व्यक्त केले होते. तसाच आभास नव काव्य साहित्यात दिसून येतो, असे प्रभा गणोरकर यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी झालेल्या काव्यजागरात बुलडाणा येथील रमेश इंगळे उत्रादकर, औरंगाबादचे श्रीधर नांदेडकर, मुंबईहून किशोर कदम-सौमित्र, ठाणे येथून प्रज्ञा दया पवार व नागपुरातून प्रफुल्ल शिलेदार सहभागी झाले. या पाचही कवींनी आपल्या काव्यप्रतिभेने उजळून टाकले. प्रास्ताविक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले, तर आभार वर्षा पतके थोटे यांनी मानले.
आज यशवंत मनोहर आणि मनोहर म्हैसाळकर
शरच्चंद्र मुक्तिबोध जन्मशताब्दी सोहळ्याच्या तिन दिवसीय कार्यक्रमात सोमवारी ऑनलाइनरीत्या पार पडणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध आंबेडकरी चिंतक यशवंत मनोहर व विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर एकत्र येणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिन सोहळ्यात ऐनवेळी सरस्वतीची प्रतिमा असल्याच्या कारणाने यशवंत मनोहर यांनी पुरस्कार नाकारला होता. हा वाद ताजाच असून, याप्रसंगी दोन्ही मनोहर एकमेकांना काय प्रतिसाद देतात, हे बघण्यासारखे असणार आहे. हा कार्यक्रम सोमवारी संध्याकाळी ६ वाजता ऑनलाइन स्वरूपाचा असणार आहे.
..........