नागपूर - नंदनवन पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या एका निवृत्त महिला डॉक्टरची अज्ञात आरोपींनी खुर्चीला बांधून आणि गळा चिरून निर्घृण हत्या केली. शनिवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास ही घटना उजेडात आल्यानंतर शहरभर खळबळ उडाली.
देवकीबाई जीवनदास बोबडे (वय ७८) असे हत्या झालेल्या वृद्धेचे नाव आहे.नंदनवन पोलिस ठाण्यातील गायत्री कॉन्हेंट परीसरात देवकीबाई बोबडे मुलगी आणि जावयासोबत राहत होत्या. त्यांची मुलगी आणि जावईसुद्धा डॉक्टर असल्याचे समजते. ते शनिवारी सकाळी कर्तव्यावर निघून गेले. दुपारी १२ ते सायंकाळी ६.३० पर्यंत देवकीबाई घरात एकट्याच होत्या. अशात त्यांच्या घरात अज्ञात आरोपी शिरले. त्यांचे कलुषित मनसुबे लक्षात आल्यामुळे देवकीबाई यांनी विरोध केला असावा. म्हणून आरोपींनी त्यांना खुर्चीला बांधले. तशाही अवस्थेत त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असावा म्हणून आरोपींनी देवकीबाई यांचे तोंडात कापड कोंबून धारदार शस्त्राने गळा त्यांचा चिरला असावा, असा संशय आहे.
रात्री ७ च्या दरम्यान नातेवाईक घरात आल्यानंतर त्यांना देवकीबाई मृतावस्थेत दिसल्या. त्यांचा गळा चिरला होता. खुर्चीला दोन्ही हात बांधून होते. खाली रक्ताचे थारोळे साचून होते. त्यामुळे नातेवाईकांनी आरडाओरड केली. ती ऐकून शेजारी धावले अन् अंगावर काटा उभा करणारे दृष्य बघून त्यांनी नंदनवन पोलिसांना सूचना दिली. घटनास्थळी धावलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात रवाना केला.
परिसरातील नागरिकांत संताप
वृद्धेच्या हत्येची घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली. त्यामुळे शहरभर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिणामी घटनास्थळी एकच खळबळ उडाली. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली. परिणामी खुद्द पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी आणि जवळपास सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणाची सविस्तर अधिकृत माहिती उघड झाली नव्हती. आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळी पोलिस पथक रवाना करण्यात आली आहे.