लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुष्यमान भारत योजना सुरू होऊन ११ महिन्याचा कालावधी होत असताना ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ची शस्त्रक्रिया केवळ शासकीय रुग्णलयांमध्येच करण्याचे निर्देश आहेत. खासगी इस्पितळांना या शस्त्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे. यामागे योजनेत शस्त्रक्रियेसाठी फार कमी निधी असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, मेयो व मेडिकलमध्ये या दोन्ही शस्त्रक्रियेचा भार वाढल्याने शेकडो रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात नागपूर जिल्ह्यात २३ सप्टेंबर २०१८ पासून झाली. या योजनेत नागपूर शहरातील २ लाख ३९८ तर ग्रामीणमधील १ लाख ७६ हजार ९०३ असे मिळून ३ लाख ७७ हजार ३०१ पात्र कुटुंबीयांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा रुग्णालयातून ही योजना सुरू झाली, तर चार महिन्यांपूर्वी दुसऱ्या टप्प्यात खासगी इस्पितळांचा समावेश करण्यात आला आहे. यात आशा हॉस्पिटल, गिल्लूरकर हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटल, महात्मे आय हॉस्पिटल, मोगरे हॉस्पिटल, एचसीजी एनसीआयएचआरआय, सूरज आय हॉस्पिटल, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जामठा, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट वेस्ट हायकोर्ट रोड, स्वामी विवेकानंद हॉस्पिटल, कुणाल हॉस्पिटल, शुअरटेक हॉस्पिटल, अर्चनेगेल हॉस्पिटल, मेडिकल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सारक्षी नेत्र हॉस्पिटल आदी २३ इस्पितळांचा समावेश आहे. यातील काही खासगी इस्पितळे गुडघा (नी) व ‘हिप’ प्रत्यारोपण करण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याकडे रुग्णही आहेत. परंतु आयुष्यमान भारत योजनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आड येत आहेत.सूत्रानुसार, खासगी इस्पितळांमध्ये या शस्त्रक्रियेला दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. योजनेत शस्त्रक्रियेचा खर्च केवळ ९० हजार रुपये आहे. खासगी रुग्णालयात लाभार्थी रुग्णांकडून वरील पैसे घेण्याची शक्यता आहे. यामुळे ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ या दोन्ही शस्त्रक्रिया मेयो व मेडिकलमध्येच करण्याच्या सूचना असल्याचे बोलले जाते. परंतु या दोन्ही रुग्णालयात अस्थिव्यंगोपचाराचे इतरही रुग्ण राहत असल्याने आठवड्यातून एक किंवा दोनच शस्त्रक्रिया होतात. विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातूनही शस्त्रक्रियेसाठी रुग्ण येत असल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. काहींना महिनाभरानंतर शस्त्रक्रियेसाठी बोलविले जात असल्याने खासगी इस्पितळांमध्ये याबाबत विचाराणा होत आहे, परंतु रुग्णांच्या पदरी निराशा पडत आहे.
आयुष्यमान भारत योजना : ‘नी’, ‘हिप रिप्लेसमेंट’ शासकीय रुग्णालयातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 10:33 PM
आयुष्यमान भारत योजना सुरू होऊन ११ महिन्याचा कालावधी होत असताना ‘नी’ व ‘हिप रिप्लेसमेंट’ची शस्त्रक्रिया केवळ शासकीय रुग्णलयांमध्येच करण्याचे निर्देश आहेत.
ठळक मुद्दे११ महिन्यानंतरही खासगी इस्पितळांना ठेवले दूर