बाबासाहेबांनी डाेक्यावर हात फिरवत यशाचे आशीर्वाद दिले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:07 AM2021-04-14T04:07:39+5:302021-04-14T04:07:39+5:30
निशांत वानखेडे नागपूर : महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना याचि देही याचि डाेळा पाहणारे फार थाेडे लाेक आता शिल्लक ...
निशांत वानखेडे
नागपूर : महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना याचि देही याचि डाेळा पाहणारे फार थाेडे लाेक आता शिल्लक आहेत; पण ज्यांनी पाहिले त्यांच्यासाठी ताे क्षण आयुष्यभर हृदयात साठवून ठेवावा, असा आहे. हा उत्साह बघायचा असेल तर दीक्षाभूमीबाहेर बाबासाहेबांचे फाेटाे व बुद्धमूर्ती विकणाऱ्या ताकसांडे आजी ऊर्फ गीता ताकसांडे यांना नक्की भेटा. त्यांचं वय ८७ वर्षांचे आहे आणि ताे क्षण त्या कधीही विसरू शकत नाही.
ताकसांडे आजी मूळच्या वर्ध्याच्या, ९ व्या वर्षी लग्न झाले आणि १५ वर्षाच्या असताना पदरात दाेन मुले आली. सासरे रेल्वेत असल्याने ते नागपूरला आले आणि स्थायिक झाले. डाॅ. बाबासाहेबांशी प्रत्यक्ष भेट झाली ती धम्मदीक्षा साेहळ्याच्या वेळी. त्यावेळी त्यांचे वय हाेते १७ वर्षे. नागपुरात या साेहळ्याची धामधूम चालली हाेती. साेहळ्यापूर्वी बाबासाहेब नागपूरला पाेहोचले. त्यावेळी आईसाेबत गीताही पाेहोचली. ती पाया पडण्यासाठी गेली; पण बाबासाहेबांनी पाया पडू दिले नाही. तिला जवळ घेऊन नाव विचारले. डाेक्यावरून हात फिरवला आणि यशस्वी हाेण्याचे आशीर्वाद दिले. ही आठवण आयुष्यभराचा अभिमान देऊन गेली. गीताने बाबासाहेबांच्या चेहऱ्यात नवकाेटीचा बाप पाहिला हाेता.
गीता ३० वर्षांची असताना पतीचे छत्र डाेक्यावरून हरपले. त्यावेळी मुलगी आणि दाेन मुलांची जबाबदारी डाेक्यावर हाेती. एकदा साेबतच्या इतर महिलांसाेबत त्या बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले त्या दिल्लीच्या घरी गेल्या हाेत्या. तेथे बुद्धाच्या मूर्ती विकायला दिसल्या हाेत्या. बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली; पण अद्याप समाजाला बुद्ध म्हणजे काेण, कसे ही जाणीव नव्हतीच. तेव्हा आजीनेही हा काेणता देव आहे, असा भाबडा प्रश्न केला. दुकानदाराने सांगितल्यावर कळले हेच तथागत बुद्ध आहेत. तेव्हा जवळ असलेल्या सर्व पैशातून त्यांनी त्या मूर्ती विकत घेतल्या. त्यांना जगण्याचा मार्ग सापडला हाेता. त्यांनी दीक्षाभूमीवर या मूर्ती विकायला मांडल्या. एक तरुण महिला दीक्षाभूमीवर बुद्धमूर्ती विकते ही बातमीही वाऱ्यासारखी पसरली. गेली ५० वर्षे त्या या प्रेरणाभूमीवर मूर्ती विक्रीचे काम करतात. याच व्यवसायाच्या भरवशावर त्यांनी तीन मुलांना शिकवून त्यांच्याच भाषेत साहेब केले. मुलीला प्राध्यापक केले, माेठा मुलगा इंजिनिअर झाला आणि लहान्याने गॅरेज टाकले. दरवर्षी देश-परदेशातून अनेक लाेक येऊन भेटतात, बाबासाहेबांविषयी विचारतात, आठवणीसाठी सेल्फी घेतात. बाबासाहेबांच्या स्पर्शाने हे घडले, असे त्या म्हणतात. त्यांनी मात्र दुकान साेडले नाही. जाेपर्यंत अंगात बळ आहे, ताेपर्यंत मी थांबणार नाही, असे त्या म्हणतात. एक दिवस याच ठिकाणी श्वास थांबेल तर धन्य हाेईल, असे सांगताना त्यांचे डाेळे पाणावले. दीक्षाभूमीवर गेलात की, आजींना भेटा, त्यांच्याकडून काहीतरी घ्या. लाखमाेलाचे समाधान मिळेल.
लाॅंग मार्चला तुरुंगात काढले चार दिवस
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यात ताकसांडे आजीचा सक्रिय सहभाग हाेता. जाेगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात त्याही लाॅंग मार्चमध्ये सहभागी झाल्या हाेत्या. पाेलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. एवढेच काय तर चार दिवस पुण्याच्या येरवाडा तुरुंगातही काढले. म्हणूनच त्या दुकान लावण्यास विराेध करणाऱ्यांना ठणकावून सांगतात. दीक्षाभूमीच्या पदाधिकाऱ्यांना मात्र त्यांच्याविषयी आदर आहे. असायलाच हवा, कारण एका युगपुरुषाच्या आठवणीचा त्या वारसा आहेत.