यंदा नागपुरात ‘बच्चा गर्मी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:07 AM2021-05-28T04:07:16+5:302021-05-28T04:07:16+5:30
नागपूर : मे महिन्यात नागपुरात प्रचंड तापणारा सूर्य यंदा नागपूरकरांवर चांगलेच मेहरबान आहे. नागपुरात मे महिन्यात दिसून येणारे ...
नागपूर : मे महिन्यात नागपुरात प्रचंड तापणारा सूर्य यंदा नागपूरकरांवर चांगलेच मेहरबान आहे. नागपुरात मे महिन्यात दिसून येणारे ४६ ते ४७ अंश सेल्सिअस असे प्रचंड तापमान यंदा बेपत्ता आहे. या वर्षी आतापर्यंत मे महिन्यात नागपूरच्या तापमानाचा उच्चांक ४२.२ अंश सेल्सिअस एवढाच राहिला आहे. त्यामुळे यंदा नागपुरात मिश्कीलपणे का होईना, ‘बच्चा गर्मी’ असल्याची चर्चा आहे.
नागपूरचा उन्हाळा म्हणजे अंग भाजून काढणारा. नऊतपाच्या काळात तर सूर्य आग ओकतो की काय असाच अनुभव येतो. त्यामुळेच वैदर्भीय उन्हाळा अनेकांना नकोसा वाटतो. ज्येष्ठ महिन्यात जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा नऊतपाला सुरुवात होते आणि पुढचे नऊ दिवस पारा तीव्रतेने वाढत जातो. मात्र, यंदा २५ मेपासून नऊ तपाला सुरुवात झाली असली तरी तापमान ४२ अंशांच्या वर जाऊ शकलेले नाही. दरवर्षी नऊतपा सुरू होण्याच्या आधीपर्यंत विदर्भाच्या बहुतांशी भागात तापमान ४४ किंवा ४५ अंश सेल्सिअसच्या घरात राहते आणि नऊ तपाला सुरुवात होताच ते ४५ अंशांच्या वर पोहोचते. मात्र यंदा चित्र पूर्णपणे वेगळे आहे. दरवर्षी राज्यात सर्वांत गरम शहराची नोंद होत असलेले चंद्रपूर आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांचे तापमान ४३ अंश सेल्सिअसवर गेले नाही. हवामान विभागाच्या मते मान्सून अंदमान आणि केरळच्या तटाजवळ पोहोचल्यामुळे आता तापमान खूप काही वाढू शकणार नाही.
- गेल्या वर्षी आणि या वर्षी नागपुरातील तापमानाची तुलना
तारीख २०२० २०२१
२१ मे ४४.२ अंश ३९.० अंश
२२ मे ४४.५ अंश ४०.९ अंश
२३ मे ४५.६ अंश ३९.९ अंश
२४ मे ४६.५ अंश ४१.३ अंश
२५ मे ४६.७ अंश ३९.४ अंश
२६ मे ४७.० अंश ४२.० अंश
२७ मे ४६.० अंश ४१.० अंश
- असा उन्हाळा अनेक दशकांनंतर अनुभवत आहे
यंदाचा उन्हाळा असा कमकुवत का आहे, या संदर्भात हवामान विभागाला विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, यावर्षी मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत वेळोवेळी झालेला पाऊस आणि त्यामुळे जवळपास रोजच निर्माण होणारे दमट हवामान याला कारणीभूत आहे. असा कमकुवत उन्हाळा अनेक दशकांनंतर अनुभवायला येत असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
- पाऊसही होईल समाधानकारक
उन्हाळाचा चांगला तापला की पाऊसही चांगलाच होतो, असा समज आहे. परंतु चांगल्या मान्सूनसाठी अजूनही काही निकष असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. यंदा ते इतर निकष स्पष्ट जाणवत असल्याने पाऊस समाधानकारक होईलच, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.