फूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 09:09 PM2019-09-17T21:09:19+5:302019-09-17T21:14:01+5:30
झोमॅटोचे टी शर्ट घालून रात्रीच्या वेळी कुलूपबंद घरात चोऱ्या करणाऱ्या बालाघाटमधील दोन सराईत चोरट्यांना गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झोमॅटोचे टी शर्ट घालून रात्रीच्या वेळी कुलूपबंद घरात चोऱ्या करणाऱ्या बालाघाटमधील दोन सराईत चोरट्यांना गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख, दागिने आणि अन्य चिजवस्तूंसह एक लाख आठ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. शुभम कमल डहरवाल (वय १९) आणि सचिन नत्थुमल डहरवाल (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शुभम बालाघाट जिल्ह्यातील बमनी (तिरोडी) येथील तर सचिन कटगटोला, रामपायली येथील रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी ते नागपुरात आले. त्यांनी गिट्टीखदानमध्ये जगदीशनगरात भाड्याने खोली घेतली. रात्रीच्या वेळी ते झोमॅटोचे टी शर्ट घालून आणि फूड डिलिव्हरीची बॅग घेऊन घराबाहेर पडायचे. वेगवेगळ्या भागात पाहणी करून ते बाहेरून कुलूप लावलेले घर शोधायचे. घराच्या दाराचे कुलूप तोडून आतमधील मुद्देमाल घेऊन ते साळसूदपणे आपल्या रूमवर परत येत होते. आकारनगरात शुभदा प्रशांत खांडेकर (वय ५५) यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या दोन्ही मुली पुण्यात शिकतात. त्यामुळे त्या घराच्या दाराला कुलूप लावून महिनाभरापासून आपल्या माहेरच्यांकडे राहायला गेल्या होत्या. १४ सप्टेंबरला सकाळी त्यांच्या शेजाºयाने त्यांना फोन करून दाराचे कुलूप तुटून असल्याची माहिती दिली. त्यावरून त्या घरी आल्या. चोरट्यांनी चांदीची भांडी, दागिने आणि बेन्टेक्स ज्वेलरी लंपास केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. चौकशीदरम्यान पहाटे २ ते ३ च्या सुमारास झोमॅटोचे टी शर्ट घातलेले दोन युवक खांडेकर यांच्या घराजवळ आले होते, अशी माहिती दिली होती. दरम्यान, गिट्टीखदान पोलीस नाकेबंदी करून गुन्हेगारांची तपासणी करीत असताना मोटरसायकलवर झोमॅटोचा टी शर्ट घालून शुभम आणि सचिन येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांच्या बॅगची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर बेन्टेक्सचे दागिने आणि चांदीची भांडी आढळली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन त्यांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी खांडेकर यांच्यासह आणखी एका घरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले दागिने आणि चोरीसाठी वापरलेल्या दुचाकीसह एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
यू ट्यूबवरून घेतला गुरुमंत्र !
पोलिसांनी या दोघांना चोरीचे तंत्र कुठे शिकले, झोमॅटोचा टी शर्ट, बॅग वापरण्याची कल्पना कुणी शिकवली, अशी विचारणा केली. त्यावर शुभमने दिलेली माहिती पोलिसांना चाट पाडणारी ठरली. यू ट्यूबवर घरफोडीचे गुन्हे पाहताना हे तंत्र आत्मसात केल्याचे शुभमने सांगितले. सचिनला आपण सहभागी करून घेतले. झोमॅटो डिलिव्हरी बॉय रात्रीबेरात्री फूड डिलिव्हरी पोहचवतात. त्यामुळे पोलीस त्यांना चेक करण्याची तसदी घेत नाही. हे ध्यानात आल्यामुळे आपण पोलिसांसमोरून बिनबोभाट जात होतो, असेही त्याने पोलिसांना सांगितले. गिट्टीखदानचे ठाणेदार सुनील गांगुर्डे, द्वितीय निरीक्षक एस. एस. अढावू, उपनिरीक्षक साजीद अहमद, हवलदार युवराज ढोले, संतोष उपाध्याय, इमरान शेख, संतोष शेंद्रे आणि आशिष बावणकर यांनी ही कामगिरी बजावली.