न्यायालय : भूखंड घोटाळ्याचा सूत्रधार नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा येथील भूखंड घोटाळ्याचा सूत्रधार बडतर्फ पोलीस शिपाई राजू रूपसिंग जगनवार ऊर्फ राजू ठाकूर याचा जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे सह सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. प्रकरण असे की, फिर्यादी सुधाकर दौलतराव बन्सोड (६४) यांनी दाभा येथील आकांक्षी गृहनिर्माण संस्थेचे खसरा नंबर ३४ मधील १७६ आणि १७७ क्रमांकाचे दोन भूखंड १८ लाख ५२ हजार ५०० रुपयांच्या करारनाम्यानुसार विकत घेतले होते. वास्तविक हे भूखंड बिलासपूर येथील दीपक कुमार रॉय आणि कृष्णा दीपक रॉय यांच्या मालकीचे होते. बडतर्फ शिपाई राजू ठाकूर याला या भूखंडांची संपूर्ण माहिती होती. त्याने हे दोन्ही भूखंड हडपण्याची योजना आखली होती. यासाठी त्याने आपले साथीदार निखिल भाऊदास भोसले आणि किशोर माणिकराव झामरे यांची मदत घेतली होती. भूखंडांचे बनावट दस्तावेज तयार केले होते. दीपक रॉय आणि कृष्णा रॉय यांच्या जागी चेन्नई येथील दोन जणांना हजर करून हे भूखंड बन्सोड यांना विकण्याचा करार केला होता. ही बनवाबनवी बन्सोड यांच्या लक्षात येताच त्यांनी १२ मे २०१५ रोजी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी भादंविच्या ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी २४ जून २०१६ रोजी निखिल भाऊदास भोसले याला अटक करून त्याचा न्यायालयातून पाच दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता. राजू ठाकूर हाच या प्रकरणाचा सूत्रधार असून त्यानेच संपूर्ण पैसे घेतले होते, असे चौकशीत निखिल भोसले याने सांगताच राजू ठाकूर याला ३० जून २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. त्याचा ७ जुलै २०१६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला होता. चौकशीत राजू ठाकूर याने नकली रॉय हे राजू शेट्टी याचे नातेवाईक असून ते चेन्नई येथील नरकुन्ड्रमनजीकच्या शक्तीनगर येथे राहत असल्याचे सांगितले होते. या गुन्ह्यातून फरार असलेला इम्रानखान याने बनावट दस्तावेज तयार केलेले आहेत. राजू ठाकूर याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज करताच त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा जोरदार युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयाला सांगण्यात आली. राजू ठाकूरविरुद्ध अकोला येथे भादंविच्या ४१९, ४२०, ४६८, ४७१, १९२, १९९, ३४ आणि सदर पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. आरोपीला जामीन मिळाल्यास तो अन्य फरार आरोपींना फरार राहण्यास मदत करेल, साक्षीदारांना फितवेल, त्यामुळे तपासावर विपरीत परिणाम होईल, असेही सरकार पक्षातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून प्रकरण गंभीर असल्याने आरोपी राजू ठाकूर याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील मदन सेनाड यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. दरेकर हे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)
बडतर्फ पोलीस शिपायाचा जामीन फेटाळला
By admin | Published: July 31, 2016 2:51 AM