ॲड. मा. म. गडकरी
माजी अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम, वर्धा
१९२० ला नागपूरमध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले. खऱ्या अर्थाने काँग्रेस संघटना ही देशव्यापी संघटना बनविण्याचे श्रेय या अधिवेशनाला द्यावे लागेल. अनेक क्रांतिकारी निर्णयाचे साक्षीदारच हे अधिवेशन ठरले. म्हणूनच सामान्यांपर्यंत काँग्रेस संघटन पोहोचले. ते पुढे मजबूतही झाले.
काॅंग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीचे स्मरण करताना अशाच काही ऐतिहासिक आठवणी ताज्या झाल्या आहेत. खऱ्या अर्थाने १९२० ला टिळकयुग संपले व गांधीयुग सुरू झाले. लोकमान्य टिळकांचे स्वप्न साकार करण्याची शक्ती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यामध्ये होती. त्यात नागपूर हे भारताच्या मध्यभागी व जणू भारताचे हृदय आहे. इथेच झिरो मैलही आहे. म्हणून काँग्रेसच्या अधिवेशनासाठी नागपूरची निवड करण्यात आली. नागपूरमधील काँग्रेसनगर व धंतोली हा परिसर त्यासाठी निवडण्यात आला. त्यावेळी सर्वश्री बॅरिस्टर मोरोपंत अभ्यंकर, गणपतराव टिकेकर, दादा धर्माधिकारी, महामुनी पूनमचंद रांका, जनरल मंचरशा आवारी इत्यादी मोठे पुढारी या शहरात कार्यरत होते.
अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून अनुभवी नेते विजय राघवाचार्य यांची निवड करण्यात आली. सर्वांना सोबत घेऊन कार्य करणे व काँग्रेस संघटनेला देशव्यापी बनविण्याचे कार्य महत्त्वाचे होते. त्यागमूर्ती पूनमचंद रांका व जनरल आवारी यांच्या परिसरात असहयोग आश्रम सुरू करण्यात आला व ज्या कार्यक्रमांची गरज देशाला व संघटनेला होती अशा कार्यक्रमांची या ठिकाणी घोषणा करण्यात आली.
अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक क्रांतिकारी निर्णय झाले. काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यास या अधिवेशनाने बळ मिळाले. त्यात काही महत्त्वपूर्ण निर्णयही झाले. २१ वर्षे वयाच्या प्रत्येक स्त्री-पुरुषांना सदस्य करण्यात आले. सदस्य शुल्क म्हणून प्रत्येकी चार आणे घेण्याचे ठरले. आपले म्हणणे सांगता येईल अशी हिंदी भाषा संपर्क भाषा ठरविण्यात आली. इंग्रजांनी या देशातील वस्त्रोद्योग देशोधडीला लावला तेव्हा अशा उद्योगाची पुनर्स्थापना करण्यासाठी खादी ग्रामोद्योगाची सुरुवात झाली. कारण होते या देशातील बेकारी संपविणे. या अधिवेशनाच्या नंतर ग्राम काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी, जिल्हा प्रांत व देशव्यापी समिती निर्माण करून देशभर संघटनेचे जाळे निर्माण करण्यात आले व सर्व कार्यकर्त्यांना जोडून ठेवणे, पूर्वीच्या गरजा पूर्ण करणे, आत्मविश्वास निर्माण करून त्याग करण्याची भावना निर्माण करणे, यावर भर दिला गेला.
या काळात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासमोर देशात त्यागी, देशभक्त, विधायक कार्यक्रमाच्या योजनेत काम करणारे नेते होते. त्यात पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, राजगोपालाचारी, लाल बहादूर शास्त्री, श्रीमती इंदिरा गांधी, लाल लजपतराय, विठ्ठलभाई पटेल, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, पं. मदनमोहन मालवीय, पं. मोतीलाल नेहरू, सरोजिनी नायडू, श्रीनिवास शास्त्री, सुभाषचंद्र बोस आदी दिग्गजांची फाैज होती. भारताच्या सर्व प्रांतात त्यावेळी हे नेते पुढे आले व हा काळच एका अर्थाने सुवर्णकाळ होता. त्यागाची एका अर्थाने परंपरा सुरू होती. किमयागार, जादूगार होते राष्ट्रपिता महात्मा गांधी.
खरे तर इंग्रजाचे राज्य अर्ध्या जगावर होते. रणाविना स्वातंत्र्य कुणालाही मिळाले नाही, असा इतिहास लोकांना माहीत होता. भगतसिंग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तसा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. मग स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कोणता उपाय? लोकात फूट पाडल्याशिवाय राज्य चालविणे शक्य नाही, हे इंग्रजांच्या लक्षात आले होतेच. मग देशभर, हिंदू-मुस्लीम भेद, सवर्ण-अवर्ण, गरीब-श्रीमंत असे दुहींचे राजकारण त्यांनी सुरू केले व जोवर लोकचळवळ उभी होणार नाही तोवर स्वातंत्र्य प्राप्त होणेही अशक्यच.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच, अशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची घोषणा. त्यामुळेच देशात चैतन्य, जोश निर्माण झाला.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक १ ऑगस्ट १९२० रोजी निवर्तले व ही नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. जहाल व मवाळ अशा सर्व नेत्यांना एका मंचावर आणून लोकचळवळ उभारण्याची गरज होती. मग गांधीयुग सुरू झाले. १९२० ची असहकाराची चळवळ, १९३० ची कायदेभंगाची चळवळ, १९४२ ची छोडो भारत-चले जाव व शेवटी १९४७ ला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले.