अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 09:54 PM2018-01-09T21:54:30+5:302018-01-09T21:56:22+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांच्या पदोन्नती व थकीत वेतनासंदर्भातील प्रकरणात ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता व सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावून येत्या ५ मार्च रोजी न्यायालयात हजर होण्याचा आदेश दिला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांच्या पदोन्नती व थकीत वेतनासंदर्भातील प्रकरणात ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता व सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावून येत्या ५ मार्च रोजी न्यायालयात हजर होण्याचा आदेश दिला.
आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती व प्रोत्साहन भत्ता देण्याचा शासन निर्णय आहे. त्याचा लाभ मिळण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दोन महिन्यांत एकस्तर पदोन्नतीचा लाभ व तीन महिन्यांत थकीत वेतन देण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे शिक्षकांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने दोन्ही अधिकाऱ्यांना मंगळवारी न्यायालयात उपस्थित होण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी आदेशाचे पालन केले नाही. परिणामी त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. अमोल चाकोतकर यांनी बाजू मांडली.