नागपुरात मोठे फटाके फोडण्यावर घातली बंदी; पर्यावरणपूरक ग्रीन दिवाळी साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 12:20 PM2020-11-13T12:20:36+5:302020-11-13T12:20:59+5:30
Diwali Nagpur News फटाके टाळून पर्यावरणपूरक ‘ग्रीन’ दिवाळी साजरी करा, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविडच्या संसर्गाची भीती कायम असतानाच दुसरीकडे दिवाळीचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. परंतु आनंदोत्सवात फटाक्यांमुळे होणारा धूर, त्यामुळे उद्भवणारे आजार आणि वाढत्या आगीच्या घटना ही चिंतेची बाब आहे. याचा विचार करता फटाके टाळून पर्यावरणपूरक ‘ग्रीन’ दिवाळी साजरी करा, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
मनपाने मोठे फटाके फोडण्यावर बंदी घातलेली आहे. कोविडच्या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करूनच दिवाळी साजरी करावी.
फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना घडतात. अशा दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. आगसंबंधी दुर्घटना घडल्यास नागपूर महानगरपालिकेद्वारे १०१ हा टोल फ्री क्रमांक सुविधेमध्ये आहे. मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वात संपूर्ण अग्निशमन यंत्रणा सज्ज आहे. नागपूर शहरात मागील दोन वर्षात फटाक्यांमुळे घडलेल्या आगीच्या घटना अगदी कमी आहेत. नागरिकांच्या खबरदारीमुळे या घटना टाळता आल्या आहेत. मागील वर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यामुळे केवळ एक आगीची घटना घडली. त्यापूर्वी २०१८ मध्ये दोन घटना घडल्या आहेत. ही संख्या शून्यावर येण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
अशी घ्या काळजी घ्या
- घरी किंवा परिसरात ज्वलनशील वस्तू ठेवू नका
- अर्धपेटलेले फटाके पुन्हा जाळू नये
- दिवे, अगरबत्ती किंवा मेणबत्ती जवळ फटाके ठेवू नका
- शक्यतो मोठे फटाके फोडू नका
- गवत व कचऱ्याच्या ढिगाराजवळ रॅकेट तथा अन्य उडणारी फटाके जाळू नये
- फटाके फोडताना जवळ एक बादली पाणी आणि एक बादली रेती ठेवा.
- फटाके उडविताना घराची दारे खिडक्या बंद ठेवा
- फटाके जाळताना सूती कपडे वापरा
- लहान मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवा
- दुर्घटना घडल्यास जळलेल्या भागावर थंड पाणी टाका व नंतर डॉक्टरांकडे जा
- आवश्यकता भासल्यास १०१ या क्रमांकावर फोन करा, जवळच्या अग्निशमन केंद्रात माहिती द्या.