मंगल कार्यालयांचाच वाजविणार बँडबाजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:11 AM2021-02-17T04:11:09+5:302021-02-17T04:11:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणामुळे मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेषता मंगल कार्यालय, लॉनमध्ये होणारे विवाह सोहळे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेषता मंगल कार्यालय, लॉनमध्ये होणारे विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रमात होणारी गर्दी संक्रमणाचे मुख्य कारण आहे. याचा विचार करता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी साथ रोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या अधिकाराचा वापर करून नवीन आदेश जारी केले आहे. या अंतर्गत गर्दी जमवून नियमाचे उल्लघन करणाऱ्यांना आकारण्यात येणारा दंड ३ ते ५ पटींनी वाढविला आहे.
सभागृह, मंगल कार्यालय, लॉन,जागा मालक (कार्यक्रम स्थळ), व्यवस्थापकाने कोविड नियमांचे उल्लंघन केले. मास्क, सॅनिटायझरचा वापर केला नाही. अधिक गर्दी जमविल्यास पहिल्यावेळी आकारण्यात येणाऱ्या ५ हजार दंडा ऐवजी १५ हजार दंड आकारला जाईल. मंगल कार्यालयांनी दुसऱ्यांदा नियम मोडल्यास ६ हजाराऐवजी २५ हजार तिसऱ्यांदा १० हजाराऐवजी ५० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. आयोजकांवरही आता थेट १० हजार दंड आकारण्याचे अधिकार दिले आहे. एवढेच नव्हे तर नियमाकडे दुर्लक्ष व हयगय केल्यास संबंधितांची मालमत्ता सील करण्यासोबतच गुन्हा दाखल करण्याचे अधिकार आयुक्तांना दिले आहेत. मनपाचे उपद्रव शोध पथक (एनडीएस), स्वच्छता अधिकारी, सहायक आयुक्त, मनपाचे सर्व वरिष्ठ सक्षम अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.
...
अशी असेल नवीन व्यवस्था
-कोविड बाधितांची वाढती संख्या विचारात घेता आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत विवाह समारंभात २०० ऐवजी आता ५० व्यक्तींना परवानगी दिली आहे. त्याहून अधिक गर्दी असल्यास कारवाई होईल.
- नवीन व्यवस्थेत नाटक, सिनेमागृह वगळता होणाऱ्या बैठका, सभा, सामूहिक समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, इनडोअर हॉल, खुल्या जागेत एकूण क्षमतेच्या २५ टक्के वा १०० पेक्षा कमी लोकांना परवानगी दिली आहे. आधी एकूण क्षमतेच्या ५० टक्के सूट देण्यात आली होती.
- कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनपाच्या झोन कार्यालयाची परवानगी घ्यावी लागेल. सहायक आयुक्तांना आठ दिवसापूर्वी कार्यक्रमाची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
....
आकारण्यात येणारा दंड
(मंगल कार्यालय, लॉन सभागृह)
आधी विद्यमान
पहिल्यांदा ५००० १५०००
दुसऱ्यांदा ८००० २५०००
तिसऱ्यांदा १०००० ५००००