लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात गुरुवारी देशातील विविध संघटनांनी पुकारलेल्या संपातबँक आणि आयुर्विमा (एलआयसी) महामंडळाच्या कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. या संपात दोन्ही संघटनांचे १६ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले. संपात वर्ग-१ आणि वर्ग-२ चे अधिकारी सहभागी झाले नाहीत.
सेंट्रल ट्रेड युनियनच्या आवाहनार्थ अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (एआयबीईए), बीईएफआय आणि ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशने संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. बँक संघटनांनी किंग्जवे येथील बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयासमोर आणि आयुर्विमा संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यालयासमोर सकाळी सरकाच्या धोरणाविरुद्ध नारे-निदर्शने केली. बँकांच्या संपात जवळपास आठ हजार तर आयुर्विमा महामंडळाच्या संपात सहा हजारांपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले.
बँकांचे खासगीकरण व आऊटसोर्सिंग थांबवा, नवीन भरतीवर निर्बंध आणा, मोठ्या कॉर्पोरेट थकबाकीदारांवर कारवाई करा, बँकांमधील ठेवींवर व्याजदरात कपात करू नये, सेवा शुल्कात वाढ तसेच आयुर्विमा महामंडळाचे भागभांडवल शेअरबाजारात विकू नका, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण थांबवा, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून १९९५ ची जुनी पेन्शन योजना व सुधारित वेतन श्रेणी लागू करा, या मागण्या कर्मचाऱ्यांनी यावेळी केल्या.
संपात बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये ईएमबीईएचे अध्यक्ष सुरेश बोभाटे, महासचिव जयवंत गुर्वे, चेंदिल अय्यर, अशोक एटकरे, सुनील पाठक, श्रीकृष्ण चेंडके, रवी जोशी, प्रभात कोकस, विजय ठाकूर, नरेंद्र भुसादे, आर.पी. राओ, अशोक शेंडे, नारायण उमरेडकर, सुनील बेलकोड आणि आयुर्विमा महामंडळ संघटनेतर्फे ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष व पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष अनिल ढोकपांडे, नागपूरच्या अध्यक्षा नेहा मोटे, रमेश पाटणे, टी.के. चक्रवर्ती, शिवशंकर निमजे, हरी शर्मा, वाय.आर. राव, नरेश अडचुले, राजेश विश्वकर्मा आणि दोन्ही संघटनांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.