लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेले समता प्रतिष्ठान बारळगण्याची तयारी सुरु असतानाच आता स्वायत्त संस्था असलेल्या बार्टीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. निधी नसल्याचे कारण सांगून प्रादेशिक विभागातील ८० कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागपुरातील बार्टीचे प्रादेशिक कार्यालयाचे महत्त्वच कमी होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ही साामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. आपल्या नावाप्रमाणेच या संस्थेचे मुख्य कार्य संशोधन व प्रशिक्षणाचे आहे. यासोबतच बार्टीच्या कार्याची मोठी व्याप्ती आहे. अनुसूचित जातीतील विद्यार्थी शिक्षण व उच्च शिक्षणात अग्रेसर असतात. युपीएससी व एमपीएससी सह विविध स्पर्धा परीक्षामध्ये अग्रेसर असतात. यात बार्टीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. बार्टीचे हे कार्य लक्षात घेऊनच मराठा समाज व ओबीसी समाजातर्फे बार्टीच्या धर्तीवर संस्था स्थापन करण्याची मागणी केली जात हाेती. हे विशेष.
कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने बजेटमध्ये कपात केली. सर्वच विभागांना याचा फटका बसला परंतु सामाजिक न्याय विभागाने मात्र निधी नसल्याच्या नावाखाली कर्मचारी कपात करण्याचा सपाटाच लाावला आहे. समता प्रतिष्ठाननंतर आता बार्टीमध्ये सुद्धा कर्मचारी कपात करण्यात येत आहे. तसे आदेशच जारी करण्यात आले आहेत.
नागपूरचे महत्त्व संपुष्टात
भाजपच्या काळात सामाजिक न्यायमंत्री हे विदर्भातील होते. त्यामुळे या भागात नागपूर हे महत्त्वाचे केंद्र ठरले होते. नागपूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानला जातो. दीक्षाभूमीला लागूनच साामाजिक न्याय भवनाची इमारत आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान स्थापन करताना याचे मुख्यालय नागपूरलाच ठेवण्यात आले. परंतु सत्ता बदलताच नागपूरचे महत्त्वही संपुष्टात आले. समता प्रतिष्ठाननंतर आता बार्टीतही कर्मचारी कपात केली जात आहे. बार्टीचे नागपुरात प्रादेशिक कार्यालय आहे. कर्मचारी कपातीनंतर या प्रादेशिक कार्यालयाचे महत्त्वच संपणार आहे, हे विशेष.