नागपुरात दाढी ५० रुपये तर कटिंग १०० रुपये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 08:15 PM2020-10-22T20:15:55+5:302020-10-22T21:09:59+5:30
Barber Saloon , Nagpur News महानगरात सलून व्यवसायाला बसलेली झळ मोठी आहे. पाच महिन्याच्या लॉकडाऊननंतर तब्बल महिनाभराने सलून व्यवसायाला परवानगी मिळाली. मात्र त्या काळात कोलमडलेला हा व्यवसाय पुन्हा उभारी घेऊ शकलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरात सलून व्यवसायाला बसलेली झळ मोठी आहे. पाच महिन्याच्या लॉकडाऊननंतर तब्बल महिनाभराने सलून व्यवसायाला परवानगी मिळाली. मात्र त्या काळात कोलमडलेला हा व्यवसाय पुन्हा उभारी घेऊ शकलेला नाही. शहरातील २५ टक्के दुकानांचे कुलूप अद्यापही उघडलेलेच नाही. म्हणायला कटिंग आणि दाढीच्या दरात वाढ झाली असली तरी, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नियम अटींचे पालन करताना या व्यवसायातील खर्चही २० टक्के वाढला आहे. ग्राहकही मंदावले आहेत. या व्यावसायिकांचा प्रवास अद्यापही संकटातूनच सुरू आहे.
दुकानांमधील दर
साधे दुकान
कटिंग - पूर्वी ७० रु. / आता १०० रु.
दाढी - पूर्वी ४० रु. / आता ५० रु.
लहान मुलांची कटिंग - पूर्वी ६० रु. / आता ८० रु.
केस काळे करणे - पूर्वी २०० रु. / आता २०० रु.
वातानुकूलित
कटिंग - पूर्वी १०० रु. / आता १५० रु.
दाढी - पूर्वी ५० रु. / आता ७० रु.
लहान मुलांची कटिंग - पूर्वी ८० रु. / आता १०० रु.
केस काळे करणे - पूर्वी ३०० रु. / आता ३०० रु.
परिस्थिती अद्यापही सावरलेली नाही. सुरक्षेच्या साधनांचा वापर वाढल्याने खर्चात वाढ झाली आहे. ग्राहकांची संख्या घटल्याने उत्पन्नही घटले आहे. अनलॉकनंतरही व्यवसायावरील संकट दूर झालेले नाही.
सतीश कान्हेरकर, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली जाते काळजी
१) संसर्ग टाळण्यासाठी सलूनमध्ये सॅनिटायझर, सोडियम क्लोराईड, मास्क, डिस्पोजेबल कापड, टॉवेलचा वापर केला जातो. सेवा देण्यापूर्वी ग्राहकाचे नाव, संपर्क क्रमांक रजिस्टरवर नोंदविला जातो.
२) अपॉईंटमेंट घेऊनच ग्राहकाला बोलावले जाते. सेवेनंतर डिस्पोजेबल कापडाची तसेच मास्कची योग्य विल्हेवाट लावली जाते. काही ठिकाणी तात्काळ वापरासाठी मास्कही उपलब्ध आहे. स्वच्छ कापडांचाही वापर होतो.
व्यावसायिकांच्या खर्चात झाली वाढ
दरवाढ २० टक्के झाली असली तरी खर्चही तेवढाच वाढला आहे. कटिंगसाठी वापरले जाणारे डिस्पोजेबल अॅप्रॉन, डिस्पोजेबल टॉवेलच्या किटची किंमत १५ रुपये आहे. स्वच्छतेसह मेन्टेनन्स खर्चही वाढला, उलट ग्राहकांची संख्या मात्र घटली. व्यवसायावर प्रचंड ताण आला आहे.
शहरात एकूण केश कर्तनालये - १०,०००
सध्या सुरू - ७,५००